साताऱ्यामधील पाटण येथील माजगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन भांडण झालं. या भांडणानंतर रागाच्याभरात पतीने स्वत:चे घर पेटवल्याने शेजारच्या नऊ घरांना भीषण आग लागली. या प्रकरणामध्ये काही देणं घेणं नसताना या वाद घालणाऱ्या कुटुंबाबरोबरच इतर नऊ संसार जळून उद्धवस्त झालेत.

ही घटना समोवारी सायंकाळी पाच वाजता घडली. आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते की त्यामध्ये सर्वच्या सर्व दहा कुटुंबांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोखड, शेतीची औजारे आदी वस्तू जाळून खाक झाल्या. मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार येथील संजय पाटील यांचं त्यांची पत्नी पालवी पाटील यांच्याशी कौटुंबिक कारणावरुन घरगुती भांडण झालं. पती पत्नीमधील हा वाद दिवसभर सुरू होता. या भांडणामुळे संतापलेल्या संजय यांनी स्वत:च्या राहत्या घरालाच आग लावली, त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलेंडर्सने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, भिमराव पाटील, दातत्रय पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, गोरखनाथ पाटील व भाडेकरू आनंदराव पाटील यांच्या सर्वांच्या घरांना भीषण आग लागली. दहा घरांना लागलेल्या या भीषण आगीत घरासह पन्नास लाखांहून अधिक नुकसान झालं आहे.

सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखान्याच्या व जयवंत शुगरच्या आग्नीशामक गाड्यांना बोलावून घेतलं. फोन केल्यानंतर काही वेळातच थोड्या थोड्या आंतरच्या फरकाने या सर्व गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमध्ये दहाही घरांमधील सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, दागिने, रोकड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

माजगाव ग्रामपंचायतीने नाळास मुबलक पाणी सोडून गावातील तरुणांनी आग विजवण्याचा खूप प्रयत्न केला. शेजारील लोकांनीही घरातील पाणीसाठा वापरुन आग विजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच माजगावचे सरपंच प्रमोद पाटील, मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक उत्तम भापकर, चाफळ पोलीस दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनी घटनास्थळी धावव येऊन सर्वतोपरी सहकार्य केले.