किरीट सोमय्यांनी माझ्या विरोधात प्रयत्न सुरू केले असले, तरी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आणि यंत्रणेला सहकार्य करण्याची माझी तयारी आहे, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्या कंपनींची चौकशी करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. ४७ शेल कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार मुश्रीफ कुटुंबीयांनी केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर विभागाला आहे. हा पैसा कोणत्या कंत्राटदारांकडून आला आहे याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे, पवार सरकारची असून, मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करावी. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात मुश्रीफ यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चौकशीला सामोरे जायला आपण तयार असल्याचे सांगितले.

आघाडीत बिघाडी होणार नाही –

गृह खात्याबद्दल शिवसेना नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीतील शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते याचे काय करायचे ते ठरवतील. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्व शंकांचे निरसन केले आहे. आघाडीत बिघाडी होणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे, असा दावा त्यांनी केला.