मला डॉक्टरांबाबत आणि त्यांच्या पेशाबाबत प्रचंड आदर आहे. डॉक्टरी पेशाबाबत मी माझे वक्तव्य केले नाही, तर काही डॉक्टरांना उद्देशून मी माझी प्रतिक्रिया नोंदवली, असे स्पष्टीकरण आता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहे. २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर येथील सरकारी रूग्णालयात अमृत दिनदयाल मेडिकल स्टोअरचे उद्घाटन अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी काही डॉक्टर गैरहजर होते. ज्यानंतर चिडलेल्या अहीर यांनी मी रूग्णालयात येणार आहे हे माहित असूनही डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षली संघटनांमध्ये सहभागी व्हावे आम्ही त्यांना गोळ्या घालू असे वादग्रस्त वक्तव्य अहीर यांनी केले होते. त्यानंतर आता डॉक्टरी पेशाबाबत आपल्या मनात अतीव आदर असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मेडिकलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या आयोजकाने आयोजित केला होता त्याचीही कार्यक्रमाला उपस्थिती नव्हती. त्यामुळे माझा पारा चढला आणि बोललो. मात्र माझे वाक्य फक्त काही डॉक्टरांना उद्देशून होते. संपूर्ण डॉक्टरी पेशाबाबत नव्हते असे स्पष्टीकरण अहीर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले. मला जनतेने केंद्रीय मंत्री म्हणून निवडून दिले आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला मी जेव्हा पोहचलो तेव्हा पाहिले की सिव्हिल सर्जनसह काही डॉक्टर चक्क रजेवर होते. त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी येऊन मेडिकलचे उद्घाटन करणार हा कार्यक्रम अचानक ठरलेला नव्हता तो पूर्वनियोजित होता. अशात अनेक डॉक्टर रजेवर का होते? असाही प्रश्न अहीर यांनी विचारला. तसेच त्या रागातून आपण बोललो मात्र डॉक्टर आणि डॉक्टरी पेशा याबाबत माझ्या मनात आदर आहे असेही त्यांनी सांगितले.