महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. प्रबोधनकार ठाकरे हे समाजकारणात होते, उत्तम लेखक आणि सुधारणावादी विचारवंत होते. त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरेंची पंचाहत्तरी झाल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या होत्या की त्यांचा उत्तराधिकारी कोण होईल? अनेकांना वाटत होतं की राज ठाकरेच उत्तराधिकारी होतील. मात्र बाळासाहेब असताना शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे निवडले गेले. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे निवडले गेले. आता मात्र शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत.

राज ठाकरेंनी बाळासाहेब हयात असतानाच शिवसेनेतून वेगळं होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्या आधी त्यांना भेटायला ते मातोश्रीवर गेले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाच्या वेळी त्यांना ढसाढसा रडताना महाराष्ट्राने पाहिलं आहे. राज ठाकरे हे स्वतःला आपण बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसरदार आहोत असं सांगतात. तर उद्धव ठाकरे हे आपणच त्यांचे राजकीय वारसदार आहोत हे सांगतात.

दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

सध्या शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय महत्त्व असलेल्या ठाकरे घराण्यातले असे भाऊ आहेत की जे एकत्र राहिले असते तर महाराष्ट्राचं चित्र आज वेगळं असतं असंही अनेक राजकीय जाणकार सांगतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांपासून वेगळे झाल्याची अनेक कारणं आहेत. मात्र त्यांनी वेगळं होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले असं स्मिता ठाकरेंनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

काय म्हणाल्या स्मिता ठाकरे?

“शिवसेनेची जी काही अवस्था झाली आहे ती पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा एकमेकांपासून वेगळे होत होते तेव्हा मी त्या दोघांना थांबवण्याचा, समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही गोष्टी खूप खोलवर गेलेल्या असतात, ज्या मनात राहतात. तसंच अनेकदा काहींचे उद्देश असेच असतात की आम्हीच वारसदार आहोत. ही वृत्ती ज्याच्या डोक्यात आहे तोच स्वतःला वारसदार म्हणवतो. मग इतर लोकांचं महत्व त्यांना राहात नाही. अशा वृत्तीने कुणी चालणार असेल तर पक्ष एकसंध कसा राहिल?” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- “अन् बाळासाहेबांचा राजा ढसाढसा रडला”, काका-पुतण्याच्या नात्यावरून मनसेची खास पोस्ट!

मी राजकारणात येऊ नये हे कुणाला वाटत होतं सगळ्यांना माहीत आहे

“बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते की ते मला राज्यसभेवर पाठवतील. माझं काम पाहून त्यांनी मला वचन दिलं होतं की तुला राज्यसभेवर पाठवेन. पण तसं घडलं नाही कारण यामागे कोण होतं हे मी सांगणार नाही. सगळ्यांना आतून माहीत होतं की मी राजकारणात यावं. काही गोष्टी अधोरेखित असतात.” असंही स्मिता ठाकरे म्हणाल्या.

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यात दुरावा आला होता का?

“माँ (मीनाताई ठाकरे) जेव्हा गेल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे खूप भावनिक झाले होते. मी तेव्हा त्यांच्याबरोबर होते. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काय झालं ते मला माहीत नाही. आम्ही (मी आणि बाळासाहेब) या विषयावर कधी बोललोही नाही. मी कायम त्यांच्याकडून जितकं चांगलं शिकता आलं तेवढं मी शिकले. माझं आणि त्यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. मी आज जे काही शिकले आहे ते सगळं बाळासाहेबांमुळेच शिकले आहे.”