ठाण्यातील टोलवाढीसंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. टोल दरवाढीला स्थगिती देण्याच्या मागणीकरता मनसेकडून हे शांततेत आंदोलन सुरू आहे. या उपोषणस्थळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. भेटीनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत येऊन त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर टिकास्र डागलं आहे.

“ठाण्यामध्ये पाचही टोलनाक्यांवर दरवाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश जाधवसह सर्व मंडळी उपोषणाला बसले होते. अविनाशला काल फोन केला आणि सांगितलं की उपोषण वगैरे आपलं काम नाही. मी उद्या सकाळी येतो असं त्याला म्हटलं. गेले अनेक वर्ष मनसेने अनेक आंदोलने केली. महाराष्ट्रातील अनधिकृत आणि अधिकृत ६५-६७ टोलनाके बंद केलीत. शिवसेना-भाजपाच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र करू असं जाहीर केलं होतं. २०१४, २०१७ लाही जाहीर केलं होतं. पण हे प्रश्न त्यांना विचारले जात नाहीत. प्रत्येकवेळी कुठेही गेल्यानंतर टोल आंदोलनावरून मला विचारलं जातं. पण त्याचे रिझल्ट अनेकांना दिसत नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ठाण्यातील पाचही टोलनाक्यांवर जे कर लावले आहेत यामध्ये नमुद केलेला रस्ता हा पेडर रोडवरचा फ्लाय ओव्हरही आहे, जो अजूनपर्यंत झालेला नाही आणि आता होईल याची शक्यता नाही. म्हणजे पूर्ण न झालेल्या रस्त्याचेही पैसे घेतले जातात. माझा प्रश्न असा आहे की, माझा टोल किती? यामध्ये गाड्या किती जातात? टोल किती जमा होतो? आणि त्या टोलचं होतंय काय? याचा अर्थ शहरांतील खड्ड्यांमध्ये रस्ते असतील, रस्ते नीट बांधले जाणार नाहीत, रोड टॅक्स, टोलही भरावे लागतात आणि इतर टॅक्सही आपण भरतो. मग पैसे जातात कुठे? पाचही टोलनाके म्हैसकरांकडे आहेत. कोण म्हैसकर यांचे लाडके आहेत? या टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका केली होती. एकनाथ शिंदेंनाही प्रश्न विचारायचा आहे की याचिका का मागे घेतली आणि कोणी मागे घ्यायला लावली?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

मला जनतेचे आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापे मारतात, तुम्हाला पिळ पिळ पिळटतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचं आहे. जी लोकं तुमच्याशी खोटं बोलत आहेत, त्यांना कधी कळलंच नाही आपण ज्या गोष्टी करतोय त्या चुकीच्या आहेत, विरोधात मतदान झालंच नाही तर त्यांना समजणार कसं? त्यामुळे दरवेळेला या गोष्टी होतात, असंही राज ठाकरे म्हणाले.

अविनाश जाधवांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं

“मी अविनाथ जाधव यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं आहे. या लोकांसाठी जीव गमावू नकोस, असं सांगितलंय. कारण एक जीव गेल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहे”, असंही ते म्हणाले.

Story img Loader