शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात दोस्तीत कुस्ती सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे ज्यात त्यांनी २ तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं म्हटलं आहे. ज्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनीही उत्तर दिलं आहे. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करुन भाजपावर आरोप केल्यानंतर रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

“मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे.” अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण हे भाजपा कार्यकर्त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी पैसे दिले असा आरोप केला आहे. त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैशांची थप्पी असलेली पिशवी आहे असं समोर आणलं होतं. याबाबत विचारलं असता रविंद्र चव्हाण यांनी २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत उत्तर दिलं आहे. ज्यावर आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

“मित्र पक्षांनी एकमेकांबाबत बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबाबतची आचारसंहिता पाळली पाहिजे. केंद्रातही युती आहे आणि राज्यातही युती आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे की प्रचार करत असतो तेव्हा खालच्या पातळीवर प्रचार करु नये. मला माहीत नाही की रविंद्र चव्हाण काय म्हणाले. पण ते असं बोलले असतील तर पुढेही युती टिकवायची आहे का? ” असं उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.

भाजपा-शिवसेनेत ऑल इज नॉट वेल?

२०२२ पासून शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष, भाजपा यांची युती आहे. २०२३ नंतर अजित पवारही राष्ट्रवादीचे आमदार घेऊन महायुतीत आले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुका भाजपा-शिवसेना (शिंदे ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी एकत्र लढवल्या होत्या आणि त्यांना या विधआनसभा निवडणुकीत २३२ जागा मिळाल्या. प्रचंड बहुमत मिळवून हे सरकार सत्तेवर आलं आहे. दरम्यान नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपा यांच्यात All is Not Well असं चित्र दिसून येतं आहे.