राज्याच्या एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना स्वयंपाकाच्या गॅसवर ५० टक्के सबसिडी द्यावी अशी मागणी ‘बिग बॉस’ या टीव्ही शोद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. आपल्या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिचुकले म्हणाले की, "एलपीजी गॅस सिलेंडर हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मी या सरकारला सूचना करतो की, त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी द्यावी." दरम्यान, यावेळी बिचुकले म्हणाले की, राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्या ही मागणी सर्वप्रथम मी केली. अंलकृता बिचुकले (अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी) यांचं नाव या पदासाठी मी पुढे आणलं. त्यानंतर आता काही नेते महिला मुख्यमंत्र्यांच्या मागणीची भाषा करत आहेत. त्यांची नावं मला घ्यायची नाहीत. मी फक्त या लोकांना इतकंच म्हणेन की, तुम्ही माझी कॉपी करू नका. मी तर बैल आहे आणि बेडकाने बैलासारखं होऊ नये हे संस्कार माझ्या आई वडिलांनी मला दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी मानतो. हे ही वाचा >> राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल, भारतीय वंशांचे खासदार म्हणाले, “हा गांधीवादी…” "स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळावी" स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळावी यासाठी मी आता कंबर कसणार आहे. राज्य सरकारने राज्यातल्या महिला नागरिकांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत दिली, याबद्दल सरकारचं अभिनंदन. मात्र आमच्या माता भगिनी केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत नाहीत. त्यांना घरदेखील सांभाळावं लागतं. त्यांना घरी पती, मुलं, सासू-सासऱ्यांसाठी स्वयंपाक करावा लागतो.. गोरगरीब जनतेसाठी सिलेंडरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, मी तो सोडवण्यासाठी कंबर कसणार.