“अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे मी अमरावतीमधून निवडणूक लढणार आहे. एनडीए युतीमध्ये असताना आठवेळा या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडणुकीला उभा होता. खा. नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे. त्यांच्यासारखे बोलण्याची सवय आम्हाला नाही”, अशी ठाम भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये काही लोकसभा मतदारसंघाच्या जागावरून रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये अमरावती आणि कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून अधिकचा तणाव निर्माण झाला आहे.

अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत कौर राणा यांनी आपल्याच भाजपाकडून ही जागा मिळेल, असा दावा केला असून अडसूळ पिता-पुत्र आमचा प्रचार करतील, असे जाहीर केले आहे. त्यांच्या या दाव्याबाबत आनंदराव अडसूळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “कपड्याच्या आतमध्ये सर्वच नग्न असतात. मात्र, राजकारणामध्ये काही लोक कपड्याशिवायही नग्न असतात. “नंगे से तो खुदा भी डरता है”, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विधानावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही.”

‘अजित पवारांनी चांगलं काम केलं, तरीही त्यांना गृहखातं देणार नाही’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

“अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा कधीही नव्हता. नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या तरी त्यांना हा मतदारसंघ मिळणार का? असा प्रश्न आहे. आम्ही मात्र आमचा दावा सोडणार नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत इथूनच निवडणूक लढविणार”, असा निर्धार अडसूळ यांनी व्यक्त केला. शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्हाला चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले आहे. त्यामुळे कुणासाठी तरी आम्ही मतदारसंघावर पाणी सोडून शिवसेनेचे नाव घालवायचे नाही.

“अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरा-समोर आले आणि…”, पुढं काय झालं?

राजकारण सोडू पण राणा यांचा प्रचार करणार नाही

लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागेल, अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली. आमच्याबाजूने निकाल लागेल, अशी आमची अपेक्षा आहे. उच्च न्यायालयाने १०८ पानांचा निकाल दिला असून नवनीत राणा यांचे सातही प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही अडसूळ म्हणाले.

तसेच नवनीत राणा आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना भाजपमध्येही पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात राज्यात आणि केंद्रामध्ये त्यांना विरोध दर्शविला असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. आम्ही एकवेळ राजकारण सोडून देऊ, पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, असेही अडसूळ यांनी जाहीर केले.