उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी मागची कहाणी सांगितली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं की, “एखादा आमदार असो वा खासदार, तो नेहमी विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही सत्तेत असताना विचारांसाठी हे पाऊल उचललं. माझ्यासोबत आलेले अनेकजण मंत्री होते, स्वत:चं मंत्रीपद धोक्यात घालून ते माझ्यासोबत आले.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका बाजूला महान नेते, बलाढ्य सरकार, यंत्रणा होती. तर दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. बाळासाहेब आणि दीघे साहेबांचा शिवसैनिक होता. जेव्हा आम्ही मिशन सुरू केलं, त्यावेळी एकानेही विचारलं नाही, कुठे चाललो, कशासाठी चाललो, किती दिवस लागतील, काहीही विचारलं नाही. जेव्हा आम्ही विधानसभेतून निघालो, त्याच्या आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. त्यादिवशी मला जी वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार सर्व आमदार आहेत.”

“पण बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं की, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड, उठाव केला पाहिजे. त्यानंतर मला काय झालं माहीत नाही, माझे धडाधडा फोन सुरू झाले. माझ्या फोननंतर सर्वजण येऊ लागले. कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, कुणी काहीही विचारलं नाही. मुख्यमंत्र्यांचे मला फोन आले. कुठे चालला आहात? त्यांनी विचारलं. मला माहीत नाही, कधी येणार तेही माहीत नाही, अशी उत्तरं त्यांना दिली. एकाही आमदारानं म्हटलं नाही, की मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊ. कारण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्यांचा विश्वास आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही,” असंही ते म्हणाले.

माझं खच्चीकरण कसं झालं? हे सुनील प्रभूंना देखील माहीत आहे. शेवटी हा एक शिवसैनिक आहे, काही व्हायचं ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल पण बाकी सारे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचं नुकसान होतंय, असं मला जेव्हा वाटेल त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून जाईन, हे मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं,” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will leave world forever said eknath shinde to rebel shivsena mla rmm
First published on: 04-07-2022 at 16:25 IST