लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : माळशिरस तालुक्याला दशहत, गुंडगिरीपासून भयमुक्त करू, असे इशारावजा विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यास माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोणी कितीही दबाव आणला तरी आपण त्यास भीक घालणार नाही. घाबरणार नाही. मी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा नातू आहे. मतदारसंघातील मोहिते-पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणारी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी प्रसंगी तुरूंगात जाण्याची तयारी आहे, असा इशारा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला.

करमाळा तालुक्यातील विविध भागात आयोजित प्रचार सभांमध्ये मोहिते-पाटील यांनी आक्रमक भाषेत फडणवीस यांच्या इशा-याला प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत बोलताना मोहिते-पाटील कुटुंबीयांचा थेट नामोल्लेख टाळत, काही लोकांच्या गुंडगिरी, दहशतीपासून माळशिरस तालुका भयमुक्त करू आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊन असे इशारासूचक विधान केले होते. त्यास प्रत्युत्तर देताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, माढा लोकसभा निवडणुकीत उभे राहिल्यापासून आपणांवर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दबाव येत आहे. परंतु असा कितीही दबाव येऊ द्या, आपण त्यास अजिबात भीक घालणार नाही. घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अजिबात घाबरणार नाही.शेवटी मी शंकरराव मोहिते-पाटील यांचा नातू आहे. खोटेनाटे आरोप करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकाविण्याचा प्रयत्न होत आहे. लोकसभा निवडणुकीत असा दबाव आणि त्रास वाढणार असल्याची जाणीव आहे. परंतु अशा कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. प्रसंगी तुरूंगात जाणे पत्करेन, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी वाचा-उदयनराजेंच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा सरदारांचे थेट वंशज मैदानात

मोहिते-पाटील यांचे माळशिरस तालुक्यातील पारंपारिक विरोधक उत्तम जानकर यांनी जुने वैर विसरून मोहिते-पाटील यांच्याशी सलगी केली आहे. जानकर यांनी मोहिते-पाटील यांना पाठिंबा न देता भाजपलाच समर्थन द्यावे म्हणून त्यांना फडणवीस यांनी विमान पाठवून नागपूरला बोलावून घेतले होते. परंतु त्यांनी आपला निर्णय कायम ठेवत मोहिते-पाटील कुटुंबीयांना साथ देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला. त्यांनीही फडणवीस यांनी मोहिते-पाटील यांना उद्देशून दिलेल्या इशाऱ्यावर कडवट टीका केली. फडणवीस हे साडेसात वर्षे राज्याचे गृहखाते सांभाळत आहेत. आतापर्यंत तुम्ही नेमके काय करीत होता ? आता सरकारमधून जायची वेळ आली असताना तुम्हाला माळशिरसमधील गुंडगिरी, दहशतवाद कसा दिसतो, असा सवाल करीत, माढा लोकसभेच्या निकालातूनच जनता तुम्हाला उत्तर देईल, असा इशारा जानकर यांनी दिला.