माझ्या जिल्हय़ात व घरादारावर येऊन मला गाडण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे, ही मस्ती येत्या निवडणुकीत आपण जिरवू, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केली.
विजयादशमीनिमित्त भगवानगडावर (ता. पाथर्डी) आयोजित केलेल्या मेळाव्यात मुंडे बोलत होते. यावेळी आमदार पंकजा मुंडे-पालवे, आमदार शिवाजी कर्डिले, गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, गडाचे विश्वस्त गोविंद घोळवे आदी उपस्थित होते.
देशातील सरकार आता औटघटकेचे राहिले आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे ठरलेले आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातही मी असेन, मोदी पंतप्रधान झाले की आपण त्यांना गडावर घेऊन येऊ, असा विश्वास व्यक्त करून मुंडे यांनी राज्यातील परिवर्तनाच्या लढाईसही तयार रहा, असे आवाहन केले. राज्यात आपला प्रभाव वाढू लागल्याने ‘त्यांच्या’ पोटात दुखू लागले आहे, परंतु आपण राज्यातील बाजारबुणग्यांना किंमत देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील साखर कारखानदारी आमच्या (ऊसतोडणी कामगार) जिवावर उभी आहे म्हणूनच राज्य प्रगती करू शकले, राज्याच्या या प्रगतीत आमचा बारामतीपेक्षा अधिक वाटा आहे, अशी टीका करून मुंडे म्हणाले, की बीड जिल्हा बँकेत राष्ट्रवादीने घोटाळे केले, परंतु माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. प्रत्यक्षात ते तशी हिंमतही दाखवू शकले नाहीत, बँकेचे सर्व कर्ज मी भरले आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे १०० कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे, ते आता दसऱ्यालाही घरात थांबू शकत नाहीत, त्यांनी आता बारामतीहूनच पैसे आणावेत असा टोला मुंडे यांनी लगावला.
मुंडे यांच्यावर अनेक राजकीय वार झाले, मात्र लोकांच्या प्रेमामुळेच ते टिकून राहिले. मुंडे खोटे बोलतात असे काही जण म्हणतात, मात्र मुंडे यांच्यामुळेच तुम्हाला प्रथम आमदारकी मिळाली, हे लक्षात राहू द्या असा टोला आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.
‘एमसीए’मध्ये रडीचा डाव
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मी अर्ज दाखल केला, परंतु त्यांनी समोरासमोर लढायचे सोडून रडीचा डाव खेळून माझा अर्ज बाद केला, क्रिकेट ही काही ‘त्यांची’ मक्तेदारी नाही, असा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी या वेळी केला.