दिल्ली-मुंबई गोल्डन कॅरिडॉरमध्ये नगरचा समावेश व्हावा, यादृष्टीने आपला प्रयत्न आहे असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. त्यात निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल गांधी व नागरी सहकारी बँक्स असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्बद्दल अशोक पितळे यांचा शहर सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष प्रा. मुकुंद घैसास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गांधी बोलत होते. बँकेच्या उपाध्यक्ष रेश्मा चव्हाण, माजी अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. कुलकर्णी यांच्यासह अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, शहराच्या विकासात शहर बँकेसह मर्चंटस् व अर्बन या तिन्ही बँकांचा मोठा वाटा आहे. शहराच्या अर्थकारण या बँकांनी मोठे योगदान दिले. मात्र विकास कामांमध्ये राजकारणाचा अडसर होत असून त्यामुळेच शहरासह जिल्ह्य़ाचा विकास खुंटला आहे. राजकीय अभिनीवेष बाजूला ठेऊन सर्वानी त्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याची गरज आहे. सहकाराचा पाया जिल्ह्य़ात रचला गेला, मात्र याच सहकार चळवळीची जिल्ह्य़ातील स्थिती फारशी समाधानकारक नाही. नगर शहरात चांगले नाटय़गृह बांधण्याची इच्छा असुनही ती आपण पूर्ण करू शकलो नाही अशी खंत गांधी यांनी व्यक्त केली.
घैसास यांनी यावेळी बोलताना म्हणाले, सर्वसामान्यांच्या पाठबळावरच गांधी लाोकसभेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. केंद्रात आता भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असून त्यामुळेच गांधी यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत असे ते म्हणाले. पितळे, गुंदेचा, लक्ष्मण वाडेकर, अशोक कानडे आदींची यावेळी भाषणे झाली. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जवाहर कटारिया यांनी आभार मानले.