IAS Officer Tukaram Mundhe Interview : अन्न व षध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या बरेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील विविध खाद्य आस्थापनांमधील गैरकारभारावर त्यांनी आक्रमकरित्या कारवाई केल्याने त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात धास्ती बसली आहे. तर, सामान्य नागरिकांकडून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जातंय. त्यामुळे त्यांच्या मुलाखती घेण्याकरताही माध्यमांत चुरस लागली आहे. दरम्यान, सर्वाधिक बदली झालेले तुकाराम मुंढे यांना नेमकं या बदल्यांबाबत काय वाटतं, याविषयी त्यांनी आज दिलखुलास माहिती दिली.
लोकांनी तुम्हाला का फॉलो करायचं?
प्रशासकीय सेवेत असलेले फार कमी अधिकारी समाजासाठी आदर्श असतात. त्यांना माणनारा एक मोठा चाहता वर्गही निर्माण होतो. तुकाराम मुंढे यांनीही असा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण सर्वाधिक बदली होणारे हे तुकाराम मुंढेंना लोकांनी कशाकरता फॉलो करायला पाहिजे, असा प्रश्न त्यांना आज विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत समर्पक उत्तर दिलं. ते बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते.
माझ्या मुलानेही मला फॉलो करू नये
तुकाराम मुंढे म्हणाले, “मला कुणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. लोकांनी कॉन्शसला फॉलो करावं. प्रत्येक व्यक्तीत एक जन्मता टॅलेंट असतं, ते फक्त ओळखायला यायला पाहिजे. माणूस जन्माला येतो तेव्हा तो वस्तूतः चांगला किंवा वाईट नसतो. तो मुळातच चांगला असतो. आई-वडिलांच्या, शिक्षणाच्या, समाजाच्या माध्यमातून प्रत्येकाची जडण-घडण होत असते. त्यानंतर आजूबाजूच्या वातावरणातील कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो यावर चांगले-वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने किंवा माझ्या मुलांनीही मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला फॉलो करावं. स्वतःत सकारात्मक बदल करावं आणि समाजात बदल घडवावा”, असं त्यांनी आवाहन केलं.
माझ्या बदल्या होतात, कारण…
“आता तुम्ही म्हणालात की माझ्या २५ बदल्या होतात किंवा एवढा त्रास होतो वगैरे. मला वाटतं की बदल हा प्रगतीचा अविभाज्य घटक आहे. जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर माझ्यात जास्त चांगले बदल घडतात असं मला वाटतं”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
