Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांची राज्यात मोठी चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळखोरांवर धडक कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरातून मोठं कौतुक होत आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याबरोबर घडलेला एक जुना किस्सा सांगितला आहे. एका हॉटेलवरील वेटरने ‘साहेब बिअर आणू का?’ असं त्यांना विचारलं होतं. मात्र, त्यानंतर तुकाराम मुंढे हे चांगलेच संतापले होते, असा हा किस्सा स्वत: तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित मुलाखतीत बोलताना सांगितला आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

तुमच्याबरोबर दिल्लीत घडलेला किस्सा काय आहे? हॉटेलमधील वेटरने साहेब बिअर आणू का? असं खरंच विचारलं होतं का? त्यानंतर काय घडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर हा किस्सा सांगताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, “खरं तर हा एक वेगळा आणि मोठा किस्सा आहे. आता तुम्ही विषय काढला म्हणून मला तो आठवला. माझं बीए झाल्यानंतर यूपीएससीची तयारी करायची असं ठरलं होतं. आता यूपीएससी म्हटलं की एक पुस्तकाचं दुकान खूप प्रसिद्ध होतं. मग तिथे दिल्लीत जाऊन पुस्तकं घ्यायचे किंवा ऑर्डर करायचे. माझ्या भावाने मला सांगितलं की तू जा आणि पुस्तकं घेऊन ये. माझ्या भावाने मला सांगण्याचा उद्धेश होता की तू म्हणजे मी दिल्लीत २,३ दिवस राहील आणि तेथे यूपीएससीच्या अभ्यासाच्या दृष्टीने काही क्लास वैगेरे पाहता येतील. त्यामुळे मी तेव्हा दिल्लीला गेलो होतो. १९९६-९७ च्या दरम्यानची ही गोष्ट आहे”, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

“तेव्हा मी पहिल्यांचाच रेल्वेमध्ये बसलो होतो. छत्रपती संभाजीनगरवरून मनमाड आणि मनमाडवरून दिल्ली, असा माझा प्रवास होता. मी दिल्लीत दुपारच्या दरम्यान पोहोचलो. दिल्लीत पहाड़गंज म्हणून एक नगर आहे, रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे. मग तेथे एका हॉटेलवर मी फ्रेश झालो आणि पुस्तक आणण्यासाठी गेलो. त्यानंतर मला जेएनयूला जायचं होतं, पण उशीर झाला म्हणून गेलो नाही. त्यानंतर मी परत त्या हॉटेलवर आलो. तेव्हा मला हॉटेलवरील वेटरने विचारलं की ‘साहेब बिअर आणू का?’ वेटरने मला असं विचारल्यानंतर मला संताप आला. तेव्हा मला असं वाटलं की याला काय वाटलं आपण दारू पितो? खरं तर दारूमध्येही प्रकार असतात हेही तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हा त्या वेटरला मी रागाने विचारलं की तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही मला बिअरबद्दल का विचारलं? तर तो वेटर मला म्हणाला साहेब बिअरच तर विचारली, दुसरं काय विचारलं? असं वेटर मला म्हणाला”, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

“त्या दिवशी त्या हॉटेलचं माझं बुकिंग होतं आणि दुसऱ्या दिवशी मला जेएनयूला जायचं होतं. मात्र, त्या वेटरने मला बिअरबद्दल विचारल्यामुळे मी त्या हॉटेलवाल्याला म्हटलं की मी तुमच्या हॉटेलवर राहू शकत नाही. लगेच मी माझी बॅग भरली आणि लगेच तिथून थेट रेल्वे स्थानकावर गेलो. मी स्वत:लाच मनात म्हणायचो की मला हे बिअर कसे विचारू शकतात? आपण अशा कल्चरमध्ये अभ्यास कसा करायचा? मग ठरवलं की मला दिल्लीत अभ्यासच करायचा नाही, मग मी रेल्वेच्या जनरल डब्ब्याचं तिकीट काढलं आणि थेट भुसावळला आलो. भुसावळवरून एका बसने जळगावला गेलो आणि जळगाववरून थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो. असा माझा दिल्लीतला किस्सा होता”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.