Tukaram Mundhe FDA Commissioner Interview: आपल्या कडक, पारदर्शक आणि धडाकेबाज कार्यपद्धतीने राजकारणी तसेच माफियांचे धाबे दणाणून सोडणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी दूध, पनीर, खव्यामधील भेसळ आणि बड्या हॉटेल्सच्या किचनवर धडक कारवायांचे सत्र सुरू केले आहे. त्यांच्या याच आक्रमक रुपाची तुलना सर्वसामान्य जनता ‘नायक’ सिनेमातील अनिल कपूरच्या पात्राशी करत असतानाच, आता थेट मुंढेंनाच ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर ‘न्यूज १८ मराठी’च्या डिजिटल पॉडकॉस्टमध्ये त्यांना ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ झाल्यास काय कराल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुंढेंनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
लोकशाहीत ‘अमर अधिकार’ कोणालाच नसतात!
“लोकशाहीमध्ये असे ‘अमर’ किंवा अमर्याद अधिकार कोणालाच नसतात. मी एक शासकीय कर्मचारी आहे आणि शासकीय सेवक म्हणून समाजाला प्रगतीच्या सर्वोच्च पातळीवर नेणं हे आमचं कर्तव्य आहे. समाजाला योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना ताकद देणं हे आमचं काम आहे. समाज जेवढा विकसित होईल, तेवढाच आपला देश आणि पर्यायाने प्रत्येक व्यक्ती विकसित होईल, लोक आनंदी राहतील.”
ते पुढे म्हणाले, “मला प्रशासनात कोणतीही जबाबदारी दिली, तर ती निभावताना प्रत्येक दिवशी मी कामाचा स्तर ‘एक इंच’ पुढे कसा नेता येईल, याच विचार करतो. हे काम करताना संपूर्ण पारदर्शकता राखणे आणि दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे यालाच माझे प्राधान्य असते.”
लोकांनी ‘नायक’ म्हटल्यावर मुंढे काय म्हणाले?
तरीही सर्वसामान्य नागरिक तुम्हाला ‘नायक’ चित्रपटातील हिरोप्रमाणे मानतात, यावर मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी एक शासकीय सेवक आहे आणि मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. तरीही लोक जर मला ‘नायक’ म्हणत असतील, तर मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या या भावनेचा चांगल्या हेतूने स्वीकार करतो. मला ‘नायक’ चित्रपटातील शिवाजी गायकवाड हा हिरो आवडला होता. मला लोकांनी फक्त एक चांगला अधिकारी म्हणण्यापेक्षा ‘बदल घडवणारा अधिकारी’ म्हटलेलं जास्त आवडेल,” असं मुंढेंनी आवर्जून सांगितलं.
बदल्यांवर बोलताना मुंढे काय म्हणाले?
२१ वर्षांच्या सेवेत २४ पेक्षा जास्त वेळा झालेल्या बदल्यांवर बोलताना ते म्हणाले की, “बदली होणे हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. मी कुठे आहे याने फरक पडत नाही, मी ज्या पदावर आहे तिथे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी १००% प्रामाणिकपणे काम करणे हे माझे कर्तव्य आहे.”
तुकाराम मुंढे यांच्या सिंघम इमेजमुळे सोशल मीडियावर त्यांची सतत चर्चा असते. यावर बोलताना ते म्हणाले की, ते स्वतःहून प्रसिद्धीचा पाठपुरावा करत नाहीत किंवा सोशल मीडियावरील कौतुकामुळे हुरळून जात नाहीत. “माझा फोकस फक्त आणि फक्त माझ्या कामावर आणि कायद्याच्या चौकटीत राहून जनतेला न्याय देण्यावर असतो,” असे त्यांनी नमूद केले.
FDA मध्ये मुंढेंचा ‘धडाका’; हॉटेल्स थेट सील!
तुकाराम मुंढे यांनी एफडीए (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे:
- किचनचे ‘रियालिटी चेक’: मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात बड्या हॉटेल्सच्या किचनची अचानक तपासणी केली जात आहे.
- थेट कारवाई: अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जा आढळल्यास कोणतीही गय न करता थेट हॉटेल्स सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
- भेसळमुक्तीचा संकल्प: सण-उत्सवाच्या काळात दूध, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी विशेष पथके तैनात केली आहेत.
