सध्या राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी तब्बल २२ दिवसांपासून काम बंद आंदोलन केलं. त्यामुळे राज्यभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये देखील हे आंदोलन ताकदीने केलं जातंय. या आंदोलनात सध्या ‘बीडचे अनिल परब’ म्हणून एका व्यक्तीची जोरदार चर्चा आहे.

बीडच्या अनिल परबांची केवळ चर्चाच नाही, तर ते स्वतः आंदोलनात सहभागी देखील झालेत. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात याच अनिल परब यांना गुलाबाचं फुल देत विलिनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची विनंती केलीय. या बीडच्या अनिल परबांचं खरं नाव अशोक जाधव असं असून ते स्वतः एसटी कर्मचारी आहेत. ते गेवराई आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत.

कोण आहेत बीडचे अनिल परब?

अशोक जाधव हे हुबेहुब राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखे दिसत असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच हे सर्व त्यांना बीडचे अनिल परब म्हणत आहेत. या बीडच्या अनिल परबांचा एसटी आंदोलनातही सक्रीय सहभाग आहे. तसेच त्यांनी विलिनीकरणाची आग्रही मागणी केली आहे.

“विलिनीकरणाची मागणी पूर्ण करा”

माध्यमांशी बोलताना बीडचे अनिल परब अशी ओळख असलेले अशोक जाधव म्हणाले, “मी हुबेहुब राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासारखा दिसतो असं म्हणत कर्मचाऱ्यांनी माझा वेगळा सन्मान केला आहे. कर्मचारी बंधू मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यातच मंत्री महोदयांना पाहतो म्हणत कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर विचार करून ती मागणी पूर्ण करण्याची विनंती केलीय.”

“वेतनवाढीवर समाधान होण्यासाठी आम्ही हा संप केलाच नाही”

“वेतनवाढ हा आमचा प्रश्न नव्हताच. मुळात आमचा प्रश्न विलिनीकरणाचा आहे. विलिनीकरण हीच आमची मूळ मागणी आहे. वेतनवाढ ही आमची मागणीच नव्हती. त्यामुळे वेतनवाढीवर समाधान होण्यासाठी आम्ही हा संप केलाच नाही. ही तुटपुंजी वेतनवाढ आहे. त्यामुळे त्यावर आमचं समाधान होणार नाही. आम्हाला फक्त विलिनीकरणच हवं आहे,” असंही अशोक जाधव यांनी नमूद केलं.

हेही वाचा : एसटी संपाबाबत जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेतल्याचा आरोप!

बीडमध्ये मागील २२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात आज (२६ नोव्हेंबर) एसटी कर्मचाऱ्यांनी संविधान दिन साजरा करून २६/११ घटनेतील शहिदांना आदरांजली अर्पण केली. तसेच यावेळी स्थानिक पोलीस बांधवांचाही सन्मान केला. वेतनवाढी प्रमाणेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी विलिनीकरणाची मागणी देखील मान्य करावी, अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे केलीय.