पुण्यातल्या डीजे आणि साऊंड सिस्टिममुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न विद्यानंद बापट यांनी जो आवाज उठवला त्यामुळे ऐरणीवर आला आहेच. अशातच भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजे. साऊंड सिस्टिम यांना विरोध दर्शवला आहे. एवढंच नाही तर गौतमी पाटीलला दहीहंडी बोलवलं गेलं आहे. असा धिंगाणा, महिलांचे अर्धनग्न नाच हे श्रीकृष्णाला, गणपतीला आवडणार आहेत का? असा सवालही मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
गौतमी पाटीलवर आक्षेप नोंदवत काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
दहीहंडीच्या वेळी, नवरात्राच्या वेळी जो काही धांगडधिंगा चालतो, आता इथे गौतमी पाटीलला बोलवलं आहे. यात कुठली धार्मिकता आहे. अर्धनग्न अवस्थेत महिला अंगविक्षेप करणार असतील तर हे श्रीकृष्णाला, गणपतीला आवडणार आहे का? याला मी धार्मिकता म्हणणार नाही. कारण हे विकृत स्वरुप झालं आहे. मी स्वतः देव, धर्म मानणारी व्यक्ती आहे. वेळोवेळी मी धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे. मी आस्तिक आहे तरीही मी सांगते आहे की हे सगळं धर्माला धरुन नाही. गौतमी पाटीलला बोलवून धिंगाणा घातला जाणार असेल तर त्यात श्रीकृष्णाची नीतीच ओळखली नाही. नवरात्रात देवीची आराधना करणं सोडून दांडियात घाणेरडी गाणी मोठ्या आवाजात वाजवली जातात. ज्या देवी घराघरांमध्ये आजारी आहेत, थकून आलेले नागरिक आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या स्वतःच्या घरात राहू देणार नाही? हा कुठला प्रकार आहे. तुम्हाला निर्बंध नकोत, पण त्यांना बंधनं पाळावी लागत आहेत त्याचं काय? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे.
गणेश मंडळांना माझं आवाहन आहे की…
कुठलीही जयंती, पुण्यतिथी असेल, सण-उत्सव असताना रस्त्यावर उतरुन धांगडधिंगा केल्यानेच धार्मिकता सिद्ध होते हे मला मान्य नाही. मोठ्या आवाजात सण साजरे केल्याने धार्मिकता जपतो असं नाही. मोठ्या आवाजांचा लोकांना त्रास होतो त्यामुळे गणेश मंडळांनी डी.जे. आणि स्पीकर्स टाळले पाहिजेत. गणेश मंडळांना मी आवाहन करते आहे असं खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. आजारी माणसं असतात, गरोदर महिला असतात, लहान मुलं असोत, अगदी कामावरुन घरी आलेल्या माणसांनाही या सगळ्याचा त्रास होतो. लोकमान्य टिळकांनी जो उत्सव ज्या उद्देशाने सुरु केला तो उद्देश हरवला आहे. डी.जे. साऊंड यांच्यापेक्षा आजच्या काळातल्या आव्हानांवर व्याख्यानमाला होऊ शकते असं मला वाटतं. मोठ्या आवाजात तर काहीच असू नये असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
