Nashik TCS Case updates reveal disturbing details of workplace : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नाशिक येथील बीपीओ युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्याने पाच सहकाऱ्यांवर लैंगिक छळ, स्टॉकिंग (पाठलाग करणे), अयोग्य स्पर्श आणि तिच्या धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच, वैयक्तिक आयुष्याबाबत अश्लिल टीकाटिप्पणी केली असल्याचाही धक्कादायक खुलासा संबंधित पीडितेने केला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मी केव्हाही मदत करायला तयार

तक्रारदार महिलेने दिलेल्या जबाबानुसार, तिने २० जून २०२५ रोजी टीसीएसमध्ये ‘असोसिएट’ म्हणून कामाला सुरुवात केली आणि २४ जूनपासून शाहरुख कुरेशी व अन्य एका सहकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तिचे प्रशिक्षण सुरू झाले. या काळात कर्ज विभागातील टीम लीडर रझा मेमन हा प्रशिक्षणाशी कोणताही संबंध नसताना वारंवार प्रशिक्षण कक्षात यायचा आणि तिच्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी करायचा. “तुझा पती शहराबाहेर असतो, तर तू हे सर्व एकटी कशी सांभाळतेस? तुला भीती वाटत नाही का? तुला काही हवे असल्यास मी कधीही मदत करायला तयार आहे”, असे त्याने म्हटल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद आहे.

…तर मी तुला एकटं सोडलंच नसतं!

तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज्ड? असे वैयक्तिक प्रश्नही संशयित आरोपीने विचारले असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. मेमनने तिला ‘प्लेअर’ असे टोपणनाव दिले होते आणि तो तिला ऑफिसमध्ये त्याच नावाने हाक मारायचा. मेमन तिच्या जवळ उभा राहून, “मी तुझा पती असतो, तर तुला कधीच एकटं सोडलं नसतं” असं खोचकपणे म्हणायचा, असाही आरोप तिने केला आहे.

जवळीक साधायचा प्रयत्न

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामावर रुजू झाल्यावर, आसिफ अन्सारी नावाच्या दुसऱ्या टीममधील कर्मचाऱ्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो विनाकारण तिच्या बाजूला येऊन बसायचा. अन्सारीने तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, हात पकडण्याचा प्रयत्न करणे, मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवणे आणि एकदा बळजबरीने मिठी मारणे, असे शारीरिक छळाचे प्रकार केल्याचा आरोप तिने केला आहे.

मी तुझ्या पतीपेक्षा जास्त देखणा

महिला विवाहित असल्याचे माहीत असूनही अन्सारीने तिला मागणी घातली. “मी तुझ्या पतीपेक्षा जास्त देखणा आहे. माझ्यासोबत बाहेर ये… काही झाले तरी कोणाला कळणार नाही”, असे तो तिला म्हणाला. दुपारच्या जेवणाच्या वेळीही तो तिच्या जवळ बसून “तुझ्या शारीरिक गरजा मी पूर्ण करेन,” अशी विधाने करायचा. याशिवाय त्याने तिच्या धर्माबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. “तुमच्या धर्मात महिला बुरखा घालत नाहीत म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात”, असे म्हणून त्याने हिंदू देवदेवतांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जानेवारी २०२६ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी त्याने तिच्या साडीवर आणि ब्लाउजवर अश्लील भाष्य केले.

तक्रारीत तौसीफ अत्तर याच्या नावाचाही उल्लेख असून, तो दररोज तिच्या डेस्कवर खायला घेऊन यायचा आणि अश्लील नजरेने बघत दुहेरी अर्थाची विधाने करायचा, असा आरोप आहे. नाशिकमधील या आयटी कंपनीत सध्या एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. यामध्ये बलात्कार आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रयत्नासारख्या गंभीर आरोपांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, टीसीएसने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कंपनीचे छळवणुकीबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे आणि तक्रारीत नाव असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी प्रलंबित असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.