पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक फोन उचलला असता आणि जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या निवडणूक गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य हातातून जाऊ दिलं पण एक फोन करुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली नाही. मला त्यांच्या या भूमिकेचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र त्यांनी हे केलं ते चांगलंच झालं आमचा फायदाच झाला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली. जनमताचा कौल भाजपा आणि शिवसेनेला होता. कारण महायुतीला १६१ जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत ५० टक्के वाटा अशा दोन मागण्या केल्या. ज्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत काडीमोड झाला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून एक सरकार महाराष्ट्रावर आलं. सुमारे महिनाभर हा सगळा सत्तापेच महाराष्ट्राने पाहिला, अनुभवला. या सगळ्या पेचामध्ये शिवसेनाही दोन पावलं मागे आली नाही आणि भाजपाही दोन पावलं मागे आला नाही. त्यामुळे या दोन मित्रपक्षांची युती तुटली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

आता निवडणूक गप्पा या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी युती तुटल्याबद्दलची खंत बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जर युतीबाबत चर्चा केली असती एक फोन केला असता तरीही कदाचित जे काही घडलं ते घडलं नसतं युती तुटली नसती. भाजपाच्या नेत्यांशी मला बोलण्याची संधी मिळाली नाही मिळाली असती तर कदाचित आणखी वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नंतर जे काही घडलं ते घडलं सुरुवातीच्या टप्प्यात युती होती त्यावेळी किमान एक फोन या दोन नेत्यांपैकी एकाने कोणीतरी उद्धव ठाकरे यांना करायला हवा होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.