scorecardresearch

“…तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं”; विजय वडेट्टीवारांचा नाना पटोलेंना घरचा आहेर

काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी ते नाना पटोले यांच्याबद्दल माध्यमांशी बोलले.

Nana Patole Vijay Wadettiwar
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट.

काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी माध्यमांनी वडेट्टीवार यांना या भेटीबद्दल विचारलं असता वडेट्टीवार म्हणाले की, “मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची मी दिल्लीत भेट घेतोय. राजकीय चर्चा आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली. या भेटीवेळी त्यांना राज्यातल्या काँग्रेसमधील आणि राजकारणातील घडामोडींची माहिती दिली.”

खर्गे यांच्या भेटीनंतर वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बातचित केली. माध्यमाच्या प्रतिनिधीने वडेट्टीवार यांना संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया विचारली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यावर आपलं मत काय? असं विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले की, “नाना पटोलेंसारखा सक्षम नेता विधानसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान होता. त्यांनी सभागृह उत्तमपणे चालवलं, सभागृहाचं नियंत्रण त्यांच्या हातात होतं.”

“…तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं”

वडेट्टीवार म्हणाले की, “नाना पटोले यांच्याकडे राज्यातले नागरिक अभ्यासू नेता म्हणून पाहात होते. परंतु त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. तसेच नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यावेळी अनेकांच्या भावना होत्या की, नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकलं असतं, अशा सर्वांच्या भावना होत्या.”

हे ही वाचा >> “…तर तुमचा हक्काचा एक आमदार विधानसभेत जाऊ शकतो”; कसबा पेठमध्ये अपक्ष उमेदवाराने थेट राज ठाकरेंकडे मागितला पाठिंबा!

काँग्रेसमध्ये बदलाचे वारे?

दरम्यान, वडेट्टीवार मल्लिकार्जुन खर्गेंना भेटायला दिल्लीत गेल्यामुळे ही भेट राज्यातल्या काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत असावी असं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ही भेट देखील त्याचा एक भाग असल्याची चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 12:32 IST

संबंधित बातम्या