महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलीय. या सभेसाठी अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असं असलं तरी या सभेची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी सुरु केलीय. विशेष म्हणजे मुंबईमधील मनसेचे अनेक नेते आज औरंगाबादमध्ये सभेच्या तयारीची पहाणी करण्यासाठी दाखल झालेत. यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.

सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे आज बाळा नांदगावकरांनी जागेची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेलच,” अशी अपेक्षा नांदगावकरांनी व्यक्त केली आहे. यावेळी पत्रकारांनी भोंग्या मुद्द्यासंदर्भात विचारले असता बाळा नांदगावकर यांनी जर आम्ही घरात पूजा करणार असू तर त्यांनी सुद्धा त्यांच्या घरात नमाज अदा करावी, अशी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आमच्या घरात पूजा-अर्चना करतो. त्यांनीही त्यांच्या घरात नमाज अदा करावी,” असं नांदगावकर म्हणाले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान राणा दांपत्याने दिलं होतं. या प्रकरणामध्ये बोलताना अनेक बड्या नेत्यांनी घरीच पूजा-अर्चना करावी असं म्हटलं होतं. त्यावरुनच नांदगावकरांनी हा टोला लगावलाय.

“आमची हिंदुत्वसाठी लढाई सुरु असून. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांसंदर्भात बोललो आहोत, याचा कोणी वेगळे अर्थ काढत असेल तर कोणी काय अर्थ काढला याला आम्ही घाबरत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना राज ठाकरेंच्या या सभेला एक लाखापेक्षा जास्त नागरिक येणार असल्याची शक्यता व्यक्त करत त्याच दृष्टीकोनातून मैदानाची पहाणी आणि नियोजन केलं जात असल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं.

पोलीस प्रशासनाने काही सूचना केल्या असून आम्ही त्या नक्कीच अंमलात आणू असंही नांदगावकर म्हणालेत. तसेच काहीही त्रुटी या सभेचं नियोजन करताना राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही नांदगावकरांनी म्हटलंय.ज्या काही त्रुटी असतील त्या सर्व तुरटी आम्ही पूर्ण करू पोलीस प्रशासनाने सूचना केल्या आहेत याची पुरवता करणार असल्याचेही यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हे म्हणाले आहेत.