मुंबईसह राज्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. तसंच मुंबईत झाड पडून एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ती घटना ताजी असेपर्यंतच अस्लम शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या सगळ्या घटना, वारंवार उद्भवणारी आपात्कालीन परिस्थिती, तुंबणारं पाणी, ३०० मिमी पावसानंतर ठप्प होणारी मुंबई, मुंबईत चार दिवसांत ३५० झाडं पडणं या सगळ्या घटनांबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांंचं परखड मत दृष्टिकोन या विशेष व्हिडीओत मांडलं आहे.

गिरीश कुबेर नेमकं काय म्हणाले?

प्रगती म्हणजे काय? प्रगतीचा अर्थ काल जी आपली अवस्था होती त्यापेक्षा आज आपल्या अवस्थेत सुधारणा होणं. आपण मुंबई, महाराष्ट्र म्हणून प्रगती करतो आहोत का? हा खरा प्रश्न आहे. मागचे चार ते पाच दिवस मुंबई आणि आसपास जे घडतं आहे त्यावरुनच हा प्रश्न पडतो आहे. २००५ मध्ये जेव्हा मुंबई जलमय झाली होती, बुडाली होती तेव्हा मुंबईचं काही खरं नाही अशी अवस्था होती. त्या वर्षी ९४६ मिमी पाऊस पडला. २४ तासांमध्ये साधारण १ हजार मिमी पाऊस पडला होता. २००५ मध्ये १ हजार मिमि पाऊस मुंबईला बुडवण्यासाठी पडावा लागत होता. प्रगती आपण करत असू तर आज मुंबईला बुडवण्यासाठी २ हजार मिमी किंवा १ हजार मिमी पेक्षा जास्त पाऊस पडायला हवा होता. २ हजार मिमी पाऊस पडला तरीही मुंबई कशी तगून राहते आहे हे दिसलं असतं. पण परिस्थिती अशी आहे की मुंबईला बुडवण्यासाठी ३०० मिमी पाऊसही पुरतो. २००५ च्या तुलनेत एक तृतीयांश पावसात मुंबई जलमय होऊ शकते याला प्रगती म्हणायचं का? असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी उपस्थित केला आहे. दृष्टिकोन या लोकसत्ताच्या विशेष व्हिडीओमध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई शहर कशा पद्धतीने माणसांना मारु लागलं आहे?

पुढे गिरीश कुबेर यांनी असं म्हटलंय की मुंबई हे शहर कशा कशा पद्धतीने माणसांना मारु लागलं आहे? याचा आढावा घ्यायला हवा. एक ११ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी येतो आणि नंतर बाईंना भेटायला जातो झाड पडतं आणि तो मरतो. एक इसम रस्त्यावरुन चाललेला असतो, रस्त्यावरचं गटाराचं झाकण उघडं असतं त्यात पडतो आणि मरतो. काही वर्षांपूर्वी जागतिक किर्तीचे मुंबईचे मोठे शल्यक होते अमरापूरकर नावाचे त्यांना गटारातून वाहून जात मरण आलं. हे शहर यावरुन काही शिकतंय का? तर आपण शून्य शिकतो आहोत. कारण गटारात पडून ज्या माणसाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला त्यानंतर महानगरपालिका असं स्पष्टीकरण देते की मॅनहोलच्या गटाराच्या कामाचा आदेशच दिला नव्हता. आदेश दिलेला नसतानाही एक माणूस मरतो याची कुणालाही खंत नाही किंवा खेद नाही. महाराष्ट्र सरकारमधला एक मंत्री म्हणतो की झाड पडून एका बालकाचा मृत्यू झाला हे झाड पडणं नैसर्गिक घटना आहे. नैसर्गिक घटनांवर जगायचं असेल तर राज्यकर्त्यांची गरज काय? निसर्ग नियमांनीच सगळं घडतंय तर मग काँक्रिटीकरण कोण करतंय? 2400 किमीचे रस्ते काँक्रिटचे करणार असं शासनातर्फे सांगितलं जातंय. हे कसं शक्य आहे? याबाबत कुणाकडे उत्तर नाही.

काँक्रिटीकरणामुळे झाडं मरत आहेत-गिरीश कुबेर

लोकसत्ताने काँक्रिटीकरणामुळे झाडं कशी मरत आहेत याच्या बातम्या छापल्या आहेत. त्यानंतर आता सरकार म्हणतं आहे की झाडांच्या शेजारी शोष खड्डे तयार करु म्हणजे पाणी जमिनीत मुरेल. आधी काँक्रिटीकरणासाठी कंत्राट द्यायचं, मग शोष खड्ड्यांसाठी कंत्राट द्यायचं असं चाललं आहे. तसंच आज सकाळी मिसिंग लिंकचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने त्यात कुणाचा बळी गेला नाही. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला सहा महिनेही झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आपल्या कामांचा दर्जा काय याचा काही अंदाज आहे का? मुंबई पुणे जो बोरघाट वापरला जातो आहे त्यात नागमोडी वळणं आहेत त्याला २०० वर्षे पूर्ण होतील तो इंग्रजांनी १८६५ मध्ये बांधला आहे. मरिन ड्राईव्ह हा स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तम पद्धतीने बांधला गेला होता. हा रस्ता खराब पातळीवर गेला जेव्हा त्याला राज्य सरकारचा हात लागला निरीक्षण गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.