TCS Harassment Case : नाशिक येथील टीसीएसच्या बीपीओत काम करणाऱ्या एका महिलेने तिचा पाठलाग, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं आणि लैंगिक शोषण याबाबत भाष्य केलं आहे. तिच्या पाच सहकाऱ्यांनी तिच्या धर्माला म्हणजेच हिंदू धर्माला कशी नावं ठेवली आणि आपल्याला त्यावरुन कसं टार्गेट केलं तेदेखील या महिलेने सांगितलं आहे. याबाबत या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
पीडितेने तिच्या जबाबात काय सांगितलं?
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार या महिलेने २० जून २०२५ ला टीसीएसच्या नाशिकमधील बीपीओत नोकरी करण्यास सुरुवात केली होती. २४ जून २०२५ ला शाहरुख कुरेशी आणि आणखी एका सहकाऱ्यासह तिचं ट्रेनिंग सुरु झालं. तिने रझा मेमन या टीम लीडवरही आरोप केले आहेत. या महिलेने सांगितल्या नुसार रझा मेमन लोन विभागाचा टीम लीड होता, त्याचा या महिलेच्या ट्रेनिंगशी काही संबंध नव्हता. तरीही तो वारंवार ट्रेनिंग रुममध्ये यायचा. तो सदर महिलेला विचाराचा की तुझा पती जर बाहेर गेला असेल तर घरात एकटी कशी काय राहतेस तुला भीती वाटत नाही का? तुला कधी गरज असेल तर मला बोलव, मी तुझ्या घरी यायला तयार आहे. त्याने या महिलेला प्लेअर असं नाव दिलं होतं. ऑफिसमध्ये सगळ्यांच्या देखतही तो या महिलेला प्लेअरच संबोधायचा. तसंच सातत्याने तो या महिलेशी तिचं लग्न, तिचा पती आणि अश्लील संभाषण साधत होता. काही वेळा तर तो तिला म्हणाला की मी जर तुझा पती असतो तर कधीही बाहेर गेलो नसतो. गुढी पाडव्याच्या दिवशी साडी नेसून आल्यानंतर रझाने तिचा पदर पाठीमागून खेचला होता. त्यानंतर जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहात होता आणि हसत होता. अशी तक्रार या पीडितेने दिली आहे. शाहरुख कुरेशीवरही या महिलेने आरोप केले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
शाहरुख कुरेशीवर केलेले आरोप काय?
या महिलेने तिच्या तक्रारीत तिचा ट्रेनर शाहरुख कुरेशी याच्यावर आरोप केले आहेत. रझा मेमन जेव्हा माझ्याशी अश्लील बोलायचा तेव्हा त्या चर्चेत शाहरुखही सहभागी होत होता. तो त्याला बोलण्यासाठी प्रोत्साहन देत होता. तसंच शाहरुखही लग्नाबाबत अश्लील प्रश्न विचारत होता.
आसिफ अन्सारीकडून सर्वाधिक लैंगिक छळ
आसिफ अन्सारी नावाच्या टीम लीडरवरही या महिलेने आरोप केले आहेत. आसिफ अन्सारीही वेगळ्या टीममध्ये होता. पण तो जाणुनबुजून माझ्याजवळ येऊन बसायचा. मुद्दाम मला कुठल्या तरी कारणाने स्पर्श करायचा. त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच मांडीवर आणि खांद्यावर हात ठेवला होता. एकदा तर त्याने माझ्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला की तू तर झीरो फिगर आहेस. एक दिवस आसिफ अचानक आला त्याने मला पाठीमागून मिठी मारली. मी त्याला जोरदार धक्का दिला आणि तिथून पळाले असं या महिलेने तक्रारीत सांगितलं. आसिफ वासनांध नजरेने मला बघत होता. तसंच माझ्या अंतर्वस्त्रांबाबतही तो प्रश्न विचारत होता. तुझ्या घरी नवरा नसेल तेव्हा मला बोलव, कुणाला काही कळणार नाही. दिवाळीच्या वेळी तो मला म्हणाला की तू साडी नेसून ये, मी तुला साडीत पाहू इच्छितो. मला माहीत आहे की तू हॉट आणि सेक्सी दिसशील. असं या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. आसिफ अन्सारी तिला म्हणाला होता की हिंदू धर्मात महिलांवर बलात्कार होतो कारण त्या बुरखा घालत नाहीत. तसंच हिंदू देवी देवतांबाबतही अपमानजनक वक्तव्यं आसिफने केली होती असाही आरोप सदर पीडितेने तिच्या तक्रारीत केला आहे. तसंच तुझ्या काही शारिरीक गरजा असतील तर मला सांग मी त्या तुझ्या घरी येऊन भागवेन असंही अन्सारी म्हणाला होता असं या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

तौसिफ अत्तारवरही गंभीर आरोप
सदर महिलेने तौफिक अत्तार नावाच्या आरोपीवरही गंभीर आरोप केले आहेत. तौफिक अत्तार टेलिकॉलर शिकवण्याच्या बहाण्याने जवळ बोलवायचा आणि गालाला त्याच्या गालाने मुद्दाम स्पर्श करायचा. कधी खांद्यावर हात ठेवायचा तर कधी मांडीवर हात ठेवायचा. एकदा मी त्याला विचारलं की हे तू काय करतोय? तर निर्ल्लजपणे म्हणाला की आपल्याला तर याच्याही पुढे जायचं आहे. गुढी पाडवा होता तेव्हा मी साडी नेसून आले होते. तेव्हा मला एक चक्कर मारायला लावली आणि म्हणाला की तू किती सेक्सी दिसतेस. तसंच त्याने माझ्याशी माझ्या पतीबाबत अश्लील आणि अपमानजनक वक्तव्यं केली.
शफी शेख नावाच्या पाचव्या आरोपीवर आरोप
शफी शेख हा देखील असा आरोपी आहे जो महिलांकडे वाईट नजरेने बघायचा. तुझ्या नवऱ्याने तुझ्याशी लग्न केलं कारण तू सुंदर आहेस. तसंच त्याने मला गोल फिरवलं आणि माझ्या संपूर्ण शरीराकडे अश्लील नजरेने बघत होता. हे तर झालं पाच कर्मचाऱ्यांचं इतर कर्मचारीही आमच्याकडे अशाच नजरेने बघायचे असंही या पीडितेने सांगितलं.
