पोलीस मुख्यालयात झालेल्या स्फोटाचा तपास लावण्यात रायगड पोलिसांना यश आले असले, तरी या स्फोटामुळे मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उजागर झाल्या आहेत. पोलीस मुख्यालयातील विसावा विश्रामगृहाच्या समोर बुधवारी दुपारी दुचाकीचा स्फोट होतो. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी जखमी होतात. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. पोलीस तपासात हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर येते. दुचाकीला स्फोटके लावून स्फोट घडवण्यात आल्याचे निष्पन्न होते.

या सर्व प्रकरणांत एक मुद्दा प्रकर्षांने समोर येतो. तो म्हणजे पोलीस मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा. पोलिसांच्या मुख्यालयात स्फोटक आणून दुचाकीत बसवले जातात. मात्र मुख्यालयात बंदोबस्ताला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची भनकही लागत नाही. विशेष म्हणजे पोलिसांचा दारूगोळा ठेवला जातो त्याच्या अवघ्या काही मीटर अंतरावर हा स्फोट घडतो. सुदैवाने स्फोटाची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
पण ज्या मुख्यालयात पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाचा तळ आहे. त्याच मुख्यालयात स्फोटके आणून फोडली जातात. यावरून पोलीस स्वत:च्याच सुरक्षेबाबत किती गाफील आहेत, हे सिद्ध होते. पोलीस मुख्यालयात कोण येते, कोण जाते याची नोंद ठेवली जात नाही, येणाऱ्या-जाणाऱ्यांची सुरक्षा तपासणी केली जात नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे रायगडचे पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांना नक्षलवाद्यांकडून धोका आहे. गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांना यापूर्वी अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर पोलीस मुख्यालयात शिरून जर कोणी स्फोट घडवत असेल, तर त्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
पोलीस कर्मचाऱ्यानेच प्रेमसंबंधातून दुसऱ्या पोलिसाचा काटा काढण्यासाठी हा स्फोट घडवला असला तरी यामुळे सुरक्षा यंत्रणांमधील फोलपणा समोर आला आहे. यातून योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्य़ातील विविध भागांत पोलिसांकडून संशयास्पद वस्तू आणि हालचालींबाबत जनजागृती करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र आपल्याच बॅनरबाबत पोलीस सजग नसल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.