सुहास बिऱ्हाडे

वसई-विरारमधील स्थलांतरित मतदारांकडे दुर्लक्ष

बहुजन विकास आघाडी अर्थात बविआची पारंपरिक निवडणूक चिन्ह शिटी हे होते. या वेळच्या निवडणुकीत ‘बविआ’ला रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले. बदललेल्या चिन्हाचा फटका ‘बविआ’ला बसला असल्याचे बोलले जात असले तरी नवमतदारांना स्वत:कडे वळविण्यात ‘बविआ’ नेतृत्वाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘बविआ’ची नालासोपारा, बोईसरमधून मते कमी झाली आहेत. दोन्ही मतदारसंघांत युतीला अनुक्रमे २४ आणि २८ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी इतर राजकीय पक्षांशी बांधिलकी असलेल्या मतदारांमुळे मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय आगरी सेनेची नाराजी दूर न केल्याचा फटकादेखील बविआला बसल्याचे घसरलेल्या मतांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

नालासोपारा पूर्वेकडे आणि वसई पूर्वेकडे मोठय़ा प्रमाणावर नवीन वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी मतदार आणि उत्तर भारतीयांनी बविआला पसंती दिलेली नाही. स्थलांतरित मतदारांची बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाशी बांधिलकी नाही. त्यामुळे ही मते युतीला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. बविआकडे असलेली विकासकांची फळी अतिक्रमणविरोधी कारवाया, विकासकांवरील गुन्हे यामुळे नाराज आहे. याचाही फटका या निवडणुकीत बसल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेतही कल कायम?

बालेकिल्ला असलेल्या नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघांत युतीने मारेलली मुसंडी आणि वसईतून कमी झालेल्या मताधिक्यामुळे बविआच्या गोटात चिंता पसरली आहे. तर हे बदलाचे संकेत असल्याने विरोधी पक्षांना आता विधानसभेत यश मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू आणि विक्रमगड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी वसई, नालासोपारा आणि बोईसरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. तसेच वसई-विरार महापालिकेत ‘बविआ’ची एकहाती सत्ता आहे. या तीन मतदारसंघांच्या जोरावरच ‘बविआ’ लोकसभेची निवडणूक लढवत होता. मात्र ‘बविआ’ला वसईतून अवघी ११ हजार ४०० मतांची आघाडी मिळाली. नालासोपारा वबोईसरमध्ये शिवेसना भाजप युतीने अधिक मते मिळवले. नालासोपाऱ्यात युतीला २४ हजार ६७० तर बोईसर मध्ये २८ हजार ३३० मते मिळाली. यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस या विरोधी पक्षांनी विधानसभेतही हाच कल कायम ठेवून विजय मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

घराणेशाहीला शह

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेना भाजप आणि काँग्रेस या प्रमुख विरोधकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. विधानसभेसाठी आम्हाला सकारात्मक वातावरण आहे, असे शिवसेना नेते शिरिष चव्हाण यांनी सांगितले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार आहेत. हा निकाल हा मोदींना मिळालेले यश असले तरी लोकांना घराणेशाही नको आहे हे अनेक मतदारसंघांत दाखवून दिले आहे. त्यामुळे वसईतील घराणेशाहीदेखील संपेल असे संकेत निकालांनी दिले आहे असे ते म्हणाले. आम्ही वसईतून लढण्याची तयारी केलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी सांगितले आहे. वसईत जास्त मते बविआला मिळाली ती केवळ मोदी नको म्हणून ख्रिस्ती आणि मुस्लीम मतदारांनी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.