IIT Bombay ceiling fans vote student suicide : विद्यार्थ्यांची सुरक्षा, आराम आणि हॉस्टेलमधील राहणीमान सुधारण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये छताच्या पंख्यांना संभाव्य पर्याय देण्याबाबत फिडबॅक गोळा केले जात आहेत. पंख्याचा प्रकार, संख्या आणि जागा याविषयी विद्यार्थ्यांची पसंती समजून घेण्यासाठी फिडबॅक फॉर्म देणअयात आला असून त्याद्वारे व्यावहारिक आणि प्रभावी पर्याय मूल्यांकित केले जाऊ शकतील, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने १८ सप्टेंबर रोजी त्याच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान त्याला मोबाईल फोन वापरताना आढळल्याचा दावा शिक्षकांनी केल्यानंतर त्याने जीवन संपवलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी एका खुल्या सभेचे आयोजन केले होते.
कोणते चार पर्याय दिले?
दरम्यान, छताच्या पंख्यासाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. भिंतीवर बसवला जाणारा पंखा, पेडेस्टल पंखा, टेबल किंवा डेस्क पंखा, टॉवर पंखा असे पर्याय देण्यात आले आहेत. जर विद्यार्थ्यांना सध्याचा छताचा पंखाच हवा असेल, तर ते “कोणताही पर्याय नको” हा पर्याय देखील निवडू शकतात. विद्यार्थ्यांना दोन वॉल-मॉउंटेड पंखे, एक वॉल-मॉउंटेड आणि एक टेबल पंखा, किंवा दोन टेबल पंखे अशा विविध पर्यायांपैकी एकाची निवड करण्यास आणि त्यांच्या निवडीचे मुख्य कारण सांगण्यास विचारण्यात आलं आहे. या कारणांच्या पर्यायांमध्ये उत्तम हवा मिळणे, अभ्यास करताना किंवा झोपताना थंडावा मिळणे, जागेची बचत, सोय आणि सुरक्षितता यांचा समावेश आहे. विद्यार्थी इच्छित असल्यास त्यांची सुरक्षितता, आरोग्य किंवा हॉस्टेलमधील अनुभवाशी संबंधित चिंता देखील मांडू शकतात.
विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये काय?
हे सर्वेक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या व्यापक सुधारणांचा एक भाग आहे. या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने लागू होणाऱ्या नवीन उपायांमध्ये हॉस्टेलमध्ये वेलनेस सेक्रेटरी, निवासी भागांत खेळाच्या जागा वाढवणे, परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालणारे उपाय आणि विद्यार्थी कल्याणासाठी एका नवीन असोसिएट डीनची नियुक्ती यांचा समावेश आहे. डीन ऑफ स्टुडंट्स अफेअर्स यांनी प्रा. केदारे यांच्या वतीने पाठवलेल्या ईमेलद्वारे ही माहिती विद्यार्थ्यांना दिली. ईमेलनुसार, शैक्षणिक, करिअर आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित बाबींवर विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर संस्थेने हा आराखडा तयार केला आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना या आणि यापुढील सर्वेक्षणांमध्ये व सल्लामसलतींमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं आहे. पंख्यांच्या बाबतीत, पर्याय निश्चित करण्यात आले आहेत, परंतु अंतिम निर्णय विद्यार्थ्यांच्या अभिप्रायानंतरच घेतला जाईल, असं ईमेलमध्ये म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत, संस्था हॉस्टेल पातळीवर वेलनेस सेक्रेटरी नियुक्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवता येईल अशा समित्या शोधण्यासाठी काम करत आहे. विभागप्रमुखांसोबत झालेल्या बैठकांमध्येही विभागाच्या पातळीवर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे आणि विद्यार्थ्यांना मिळणारा पाठिंबा मजबूत करणे यावर भर देण्यात आला आहे. खेळाच्या जागांसाठी, योग्य जागा निश्चित करण्यासाठी, रहिवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि सुविधेची उपलब्धता तपासण्यासाठी जनरल सेक्रेटरी, स्पोर्ट्स काउन्सिलर आणि वॉर्डन यांचा सल्ला घेतला जाईल.
दरम्यान, वाकोडे यांचे आई-वडील, रवींद्र आणि सोनाली वाकोडे यांनी आरोप केला आहे की, त्यांचा मुलगा आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये जातीवर आधारित भेदभावाचा बळी ठरला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.
