IIT Bombay Sahil Wakode case details : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात एक नवीन माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने त्याच्या एका मित्राचा जबाब नोंदवला आहे. साहिलने या मित्राशीच शेवटचा संवाद साधला होता, असा पोलिसांचा दावा आहे. साहिलने शेवटच्या संभाषणात थर्मोडायनामिक्स परीक्षा कठीण गेल्याचं मित्राला सांगितलं होतं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अपेक्षेप्रमाणे परीक्षा न गेल्यामुळे साहिल चिंतेत होता. त्याला चांगले गुण मिळवायचे होते. मित्राने पोलिसांना असंही सांगितलं की, या फोन संभाषणादरम्यान साहिलने परीक्षेत त्याला कॉपी करताना पकडण्यात आल्याचा उल्लेख केला होता. या आरोपाची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि हा सध्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. पोलीस परीक्षेच्या वेळची परिस्थिती आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींचा अभ्यास करत असून, त्याच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा क्रम जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

फोन अनलॉक करणार, अनेकांचे मेसेज अन् नोटिफिकेशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने आतापर्यंत या तपासाचा भाग म्हणून २० लोकांचे जबाब नोंदवले आहेत. परीक्षेच्या वेळी उपस्थित असलेले विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांचा यात समावेश आहे. साहिलच्या मृत्यूच्या आधीच्या तासांमध्ये ज्यांनी त्याच्याशी संवाद साधला, त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस साहिलचे फोन रेकॉर्ड्स आणि मित्रांसोबतचे संभाषणही तपासत आहेत. त्याचा मोबाईल फोन पॅटर्न लॉकने सुरक्षित असून फॉरेन्सिक तज्ज्ञ हे उपकरण अनलॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्क्रीनवर अनेक मिस्ड-कॉल नोटिफिकेशन्स दिसत असल्याचं वृत्त आहे, ज्याचा तपास पोलीस घटनांचा अचूक क्रम (टाइमलाइन) निश्चित करण्यासाठी करत आहेत. साहिलच्या हालचालींची पुनर्रचना करण्यासाठी आणि त्याच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा क्रम समजून घेण्यासाठी गुन्हे शाखेने परीक्षा हॉल, कॅम्पस आणि हॉस्टेलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहे.

१९ सप्टेंबर रोजी क्राईम ब्रँचने या तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनांची तपशीलवार टाइमलाइन तयार करण्यासाठी तपासकर्ते विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर साक्षीदारांचे जबाब, तसेच सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करत आहेत. २५ सप्टेंबर रोजी साहिलच्या पालकांनी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आयआयटी मुंबईला भेट देऊन या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तपास सुरू असताना, पोलीस साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांच्या माध्यमातून साहिलच्या शेवटच्या तासांमधील घटनांचा क्रम जोडत आहेत. परीक्षेतील ती घटना किंवा इतर कोणताही घटक त्याच्या मृत्यूशी संबंधित होता की नाही, हे पोलीस अद्याप निश्चित करू शकलेले नाहीत.