आयआयटी मुंबई (IIT Bombay) मधील २२ वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. साहिलने वसतिगृहातील आपल्या खोलीत जीवन संपवल्यानंतर त्याच्या पालकांनी संस्थेतील प्राध्यापकांवर गंभीर जातीभेदाचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी एफआयआर (FIR) मध्ये नाव असलेले प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी साहिलच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

“आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे कठीण असते, म्हणून सहन कर असे सांगितले”

“आम्हीच आमच्या मुलाला सहन करायला सांगत राहिलो, हीच आमची मोठी चूक झाली,” असा हृदयद्रावक आक्रोश साहिलच्या आई-वडिलांनी केला आहे. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी अत्यंत भावुक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “साहिलने यापूर्वीही प्राध्यापकांकडून होणाऱ्या जातीभेदाची आणि मानसिक छळाची माहिती आम्हाला दिली होती. पण, आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे हे अत्यंत कठीण असते, त्यामुळे थोडं सहन कर, असे आम्हीच त्याला सांगत राहिलो,” असे सांगताना त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

ते पुढे म्हणाले, “एफआयआरमध्ये सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत. संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची चौकशी झाली पाहिजे. एफआयआरमधील प्रत्येक शब्द सत्य आहे. साहिल अत्यंत हुशार विद्यार्थी होता. ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ (JEE Advanced) परीक्षा उत्तीर्ण होऊन ऑल इंडिया रँक मिळवणे ही सामान्य गोष्ट नाही. आता प्रकरण भरकटवण्यासाठी त्याच्यावर विविध प्रकारचे खोटे आरोप केले जातील, पण आमची एकच मागणी आहे – दोषींना तात्काळ अटक झाली पाहिजे.”

“माझा मुलगा अत्यंत गुणवंत होता, त्याला न्याय द्या!” – आईची आर्त हाक

साहिलची आई सोनाली वाकोडे, ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत, त्यांनी दोन्ही हात जोडून समाजाला आणि प्रशासनाला न्यायाचे आवाहन केले. “मी एक आई आणि शिक्षिका आहे. मी माझा काळजाचा तुकडा गमावला आहे. आईचे हे दुःख केवळ एक आईच समजू शकते. साहिलला तुमचाच मुलगा माना आणि त्याला न्याय मिळवून द्या,” असे सांगत त्यांनी टाहो फोडला.

आयआयटीमधील वातावरणावर प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या, “आयआयटीसारख्या नामांकित संस्थेत इतके विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत, याच्या मुळाशी जाऊन चौकशी करा. तुम्हीही या समाजाचे नागरिक आहात, तुमची मुलेही चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये जातात. तिथे जर अशी परिस्थिती असेल, तर पालकांनी काय करायचे? आम्ही आमच्या मुलाला मानसिक आधार दिला, ‘आपले भविष्य खूप उज्ज्वल असेल बाळा’ असे सांगत राहिलो. कदाचित हीच आमची चूक ठरली. त्या दिवशी जर आम्ही त्याला सोबत घरी घेऊन गेलो असतो, तर आज माझा मुलगा जिवंत असता.”

संचालकांवरही गंभीर आरोप; चौकशीची मागणी

साहिलच्या पालकांनी या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यासोबतच आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांच्यावरही साहिलचा मानसिक छळ केल्याचा थेट आरोप केला आहे. १८ सप्टेंबर रोजी साहिलचा मृतदेह त्याच्या वसतिगृहातील खोलीत आढळून आला होता. या घटनेनंतर शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.