पवई येथील नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मुंबई) पुन्हा एकदा एका दुर्दैवी घटनेने हादरली आहे. आयआयटी मुंबईमधील एका विद्यार्थ्याने परीक्षेदरम्यान मोबाईल फोन आणि ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याच्या आरोपावरून झालेल्या कारवाईनंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत मोबाईल वापरल्याच्या आरोपावरून चौकशी झाल्यानंतर काही तासांतच या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. या प्रकरणी पवई पोलिसांनी आयआयटी मुंबई प्रशासनाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदूस्तान टाइम्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या घटनेनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला असून, मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पोलिसांची कारवाई काय?

विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आयआयटी प्रशासनाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (SC/ST Act) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही याप्रकरणी आयआयटी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

“आमचा मुलगा लढवय्या होता, न्याय मिळेपर्यंत हटणार नाही” – पालकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याचे आई-वडील यवतमाळवरून मुंबईत दाखल झाले. मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसलेल्या पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

“आम्हाला आमच्या मुलाच्या मृत्यूचे स्पष्टीकरण हवे आहे. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. तो अत्यंत गरिबीतून पुढे आला होता आणि कठीण प्रसंगांना तोंड देणारा लढवय्या होता. तो असा सोपा मार्ग निवडूच शकत नाही. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय आणि स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मुख्य प्रवेशद्वारावरून हलणार नाही,” असा इशारा मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी दिला आहे.

पालकांनी आयआयटी मुंबईचे संचालक आणि डीन यांच्या अटकेची मागणी केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

शिक्षकांनी खालच्या जातीचा म्हणून हिणवले; पालकांचा गंभीर आरोप

‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील म्हणाले, “आयआयटी मुंबईचे संचालक (डायरेक्टर) आणि शिक्षक यांनी मिळून त्याला टॉर्चर केले आहे. टॉर्चरदरम्यान काय केले, याचा शोध लागला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोवर आम्ही येथून मृतदेह हलवणार नाही. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. आम्ही येथे मेलो तरी चालेल; आम्ही गरिबीतून पुढे आलो आहोत. तो धाडसी होता, तो आत्महत्या करणारा नव्हता. त्यांनी जातीवाद केला, त्याला न्याय मिळाला पाहिजे.”

नेमके काय घडले? AI (ChatGPT) च्या वापरावरून वाद

शुक्रवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान मोबाईलवरून उत्तरपत्रिकेचा फोटो काढणे किंवा चॅटजीपीटी (ChatGPT – आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल) चा वापर करून प्रश्नपत्रिका अपलोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या विद्यार्थ्यावर करण्यात आला होता. यानंतर त्याला परीक्षागृहातून बाहेर काढण्यात आले आणि निलंबनासह शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी देण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

मात्र, आयआयटी मुंबई प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकानुसार:

  • विद्यार्थ्यावर कोणतीही कठोर शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात आली नव्हती.
  • संबंधित विषयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याचे समुपदेशन (Counseling) केले होते.
  • या घटनेचा त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर किंवा करिअरवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असे त्याला स्पष्टपणे सांगण्यात आले होते.

कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि तणाव

शनिवारी सकाळपासूनच आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने सुरू केली. विविध विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त (DCP) दत्तात्रय नलावडे यांनी कॅम्पसला भेट दिली. “विद्यार्थ्यांच्या प्रशासनाबाबत काही अंतर्गत मागण्या आणि मुद्दे आहेत, ज्यावर आयआयटी प्रशासन चर्चा करत आहे. काही आंदोलक निघून गेले असले तरी काही विद्यार्थी अजूनही उपस्थित आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

गुणवंत खेळाडू आणि यवतमाळचा संघर्षमय प्रवास

आत्महत्या केलेला विद्यार्थी मूळचा यवतमाळचा होता. दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळमध्ये पूर्ण केल्यानंतर त्याने जेईई (JEE) परीक्षेच्या तयारीसाठी नागपूर गाठले होते. कठोर परिश्रमानंतर त्याला आयआयटी मुंबईत प्रवेश मिळाला होता. शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त तो बॅडमिंटन आणि स्केटिंगचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, पवई येथील आयआयटी कॅम्पसमध्ये घडलेली या वर्षातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही तिसरी दुर्दैवी घटना आहे. यामुळे आयआयटीमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि प्रशासकीय मानसिकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.