IIT Bombay Student Suicide Case : आयआयटी मुंबईच्या दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने शुक्रवारी परीक्षागृहात मोबाईल फोन वापरताना पकडल्याच्या काही तासांनंतर आत्महत्या केली. या १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे कॅम्पसमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. तसंच, सुरू असलेल्या मध्य-सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील हा विद्यार्थी परीक्षागृहात मोबाईल फोन वापरत असल्याचं आढळून आल्याचा दावा संस्थेने केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या विद्यार्थ्याने उत्तरांचा शोध घेण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. “दिवसाच्या सुरुवातीला, एका परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षागृहात मोबाईल फोन वापरताना आढळला होता. त्याने उत्तरांचा शोध घेण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. या विषयावर संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली होती, त्याचं समुपदेशन केलं होतं आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असं आश्वासनही दिलं होतं. त्यानंतर हा विद्यार्थी त्याच्या हॉस्टेलमधील खोलीत परतला. नंतर संध्याकाळी तो त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला”, असं या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या आईने संस्थेविरोधात संताप व्यक्त केला आहे. “या संस्थेने माझ्या मुलाला मारलं. त्यांनी त्याला टॉर्चर (छळ केला) केलं”, असं त्या म्हणाल्या. तसंच, “आम्हाला न्याय पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचंही त्यांनी आज माध्यमांना सांगितलं.
शिक्षकांनी खालच्या जातीचा म्हणून हिणवलं
तर, झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील म्हणाले, “आयआयटी मुंबईचे डायरेक्टर आणि शिक्षक यांनी मिळून त्याला टॉर्चर केलं आहे. टॉर्चरदरम्यान काय केलं, याचा शोध झाला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून मृतदेह हलवणार नाही. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. आम्ही येथे मेलो तरी चालेल, आम्ही गरिबीतून वाढलो आहेत. तो डेअरिंगबाज होता, तो आत्महत्या करणारा नव्हता. त्यांनी जातीवाद केला. त्याला न्याय मिळाला पाहिजे.”
“त्याचा शिक्षक त्याला खालच्या जातीचा म्हणून आधीपासूनच हिणवत होता, या संस्थेचे डायरेक्टर या शिक्षकाला पाठिंबा देत होते”, असा गंभीर आरोपही वडिलांनी केला.
परीक्षा पुढे ढकलल्या?
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली मध्य-सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. “प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांची नेहमीच एक तक्रार राहिली आहे की, आत्महत्येसारख्या गंभीर घटनेनंतरही त्यांचं कामकाज नेहमीप्रमाणंच सुरू राहतं. आज रात्री अनेकांनी या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, ज्यानंतर मध्य-सत्र परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली”, असं एका विद्यार्थ्याने सांगितले.
प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “आयआयटी मुंबईला (IIT Bombay) एका विद्यार्थ्याच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. संस्था या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्याचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि इतरांना मदत करत आहे. या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी योग्य अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे.”
