अलिबाग– बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र या अटी व शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन जोमाने सुरु झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. समुद्र किनाऱ्यांवर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यावर प्रतिबंध करण्याची मागणी प्राणीमित्र संघटनांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनावर असलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र ही बंदी उठवतांना काही अटी आणि शर्ती न्यायालयाने घालून दिल्या आहेत. याकडे स्पर्धेच्या आयोजकांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. स्पर्धेच्या आयोजनापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी न घेताच या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे दिसून येत आहे.

समुद्र किनाऱ्यांवर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यास मनाई असतांनाही जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्र किनाऱ्यांवर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांदरम्यान गेल्या काही वर्षात प्रेक्षक जखमी होऊन त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे आयोजित होणाऱ्या स्पर्धां रोखाव्यात अशी मागणी प्राणी मित्र संघटनांनी केली आहे.

अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांकडे प्रशासनाची डोळोझाक होत आहे. दुर्घटनांनंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार केले जातात. त्यामुळे पोलीस आणि महसुल प्रशासनाने अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी स्पर्धांना प्रतिबंध घालावा. स्पर्धांचे रितसर परवानगी घेऊन आयोजन व्हावे, न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन व्हावे, स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी आयोजकांनी घ्यावी अशी मागणी या निमित्याने होऊ लागली आहे.

सागरी किनाऱ्यांवर बैलगाडी शर्यत घेण्यास बंदी घातली आहे. मात्र नियम मोडून समुद्र किनाऱ्यांवर स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा पध्दतीने अनधिकृत स्पर्धांचे आयोजन केले जात असेल तर आयोजकांवर ठोस कारवाई व्हायला हवी, स्पर्धेदरम्यान जखमी होणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी ही आयोजकांवर टाकायला हवी. – जितेंद्र कोळेकर, प्राणी अधिकार कार्यकर्ते.

प्रामुख्याने अलिबाग आणि मुरुड तालुक्यात समुद्र किनाऱ्यांवर पहाटेच्या वेळी बैलगाडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. बहुतांश वेळा या स्पर्धांची परवानगीही घेतली जात नाही. हौशी बैलगाडी चालक एकत्र येऊन लहान मोठ्या स्पर्धांचे आयोजन करत राहतात. आठ साडे पर्यंत स्पर्धा संपवून हे बैलगाडी चालक परतीच्या मार्गाला लागतात. पुर्वी भांडी, पाण्याचे पिंप अशी बक्षीसे या स्पर्धेसाठी दिली जात असत, आता लाखो रुपयांची बक्षीसे लावली जातात.