अहिल्यानगर: जिल्ह्यात गावठी कट्ट्यांच्या सुळसुळाटाने मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांनी गेल्या ४ वर्षांत २४८ गावठी कट्टे व ४०० हून अधिक काडतुसे जप्त केली, मात्र तरीही गावठी कट्ट्यांच्या वापराला पायबंद बसलेला नाही. गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारी टोळ्यांकडून गोळीबाराच्या ३१ घटना घडल्या. गेल्या दीड महिन्यातच गोळीबाराच्या ५ घटना घडल्या. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे.

अर्थात ही सर्व आकडेवारी दाखल झालेल्या गुन्ह्यांची आहे. काही गुन्ह्यांमधून गावठी कट्ट्यांचा वापर होऊनही ते दाखल झालेले नाहीत. काल, गुरुवारी चोवीस तासांत गोळीबाराच्या लागोपाठ दोन घटना घडल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारी गंभीर ठरते.

गावठी कट्ट्यांच्या वापराबद्दल तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. समाज माध्यमांवर रील बनवण्यासाठीही गावठी कट्टे वापरले जात आहेत. जिल्ह्यात बहुतांशी गावठी कट्टे मध्य प्रदेशातून आणले जातात. १० ते १५ हजार रुपये किमतीत मिळणारे गावठी कट्टे जिल्ह्यात आणून २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विकले जातात. अशी खरेदी-विक्री करणारी मोठी साखळीच जिल्ह्यात कार्यरत आहे. चार वर्षांत या साखळीतील २५० आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या साखळीतील दुवे पकडले जातात. मात्र मुख्य आरोपी पसारच असतात. मध्य प्रदेशातील शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यांपर्यंत जिल्ह्यातील पोलीस पोहोचू शकत नाहीत. वाळू तस्करी करणाऱ्या टोळ्या सर्रासपणे गावठी कट्ट्यांचा वापर करतात. नगर शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्या कट्ट्यांचा वापर करताना आढळतात. महाविद्यालयीन तरुणही कट्टे कमरेला खोचून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धमकावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे गुन्हेही पोलिसांकडे दाखल आहेत.

नगर शहरासह पांढरीपूल, सोनई, शनिशिंगणापूर, नेवासा, श्रीरामपूर हा पट्टा गावठी कट्ट्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात बहुतांशी तरुण आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या संख्येवरून ते लक्षातही येते. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांकडून सन २०२४ मध्ये गोळीबाराच्या १६ घटना घडल्या तर सन २०२५ मध्ये गोळीबाराच्या १० घटना घडलेल्या आहेत. सन २०२६ च्या पहिल्या दीड महिन्यातच गोळीबाराच्या ५ घटना घडल्या. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. नगर शहरात शहराच्या कोठला भागात आज, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर पुन्हा दुपारी घोडेगाव (ता. नेवासा) येथे गोळीबाराची घटना घडली.

जप्त गावठी कट्ट्यांची किंमत ७३ लाख रुपये

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२२ मध्ये ४२ आरोपींकडून ५० कट्टे व १०४ काडतुसे, सन २०२३ मध्ये ५४ आरोपींकडून ५३ कट्टे व ११६ काडतुसे, सन २०२४ मध्ये ७४ आरोपींकडून ६१ कट्टे व १३१ काडतुसे, सन २०२५ मध्ये ८० आरोपींकडून ५७ गावठी कट्टे व १४९ काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त केलेली कट्टे व काडतुसांची एकूण किंमत सुमारे ७३ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त गोळीबाराच्या घटनांतील २५ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत.

शोधमोहिमा सुरू

जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढते आहे, परप्रांतीय कामगारांकडे गावठी कट्टे आढळत आहेत. समाज माध्यमांचे आकर्षण तरुणांमध्ये वाढते आहे. या समाज माध्यमांमधूनही गुन्हेगारी वाढीस लागली आहे. त्यातूनही कट्ट्यांचा वापर वाढला आहे. समाजामध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचा परिणामही दिसतो आहे. पोलीस गावठी कट्ट्यांच्या शोधासाठी मोहीम सातत्याने राबवतात, त्याचबरोबर खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला पायबंद बसावा, यासाठी कडक उपाययोजना राबवल्या जातील.
किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा