अधिकृत पासपोर्ट व व्हिसा नसताना भारतात घुसखोरी करून रायगड जिल्ह्य़ातील रिसकांबे ता. खालापूर येथे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अलिबागच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्यांना आश्रय देणाऱ्या भारतीय नागरिकालाही एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शर्मिला अमिन शेख व रोमा आलमगीर शेख अशी शिक्षा झालेल्या बांगलादेशी घुसखोर महिलांची नावे आहेत, तर राजेशकुमार साहू याने त्यांना आश्रय दिला होता.
रायगड पोलिसांच्या बांगलादेशी घुसखोर विरोधी पथकाने या महिलांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र अधिनियम व परदेशी नागरिक अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आश्रय देणारा राजेशकुमार साहू याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिन्ही जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एन. कदम यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. महेश ठाकूर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
रायगड जिल्ह्य़ात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची समस्या गंभीर होत चालली असतानाच लागोपाठ दोन खटल्यांमध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.