मुंबई: राज्यामध्ये बेकायदा बेदाणा आयात करून साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिले. राज्यातील बेदाणा दर्जेदार असताना काही व्यापारी कमी दर्जाचा बेदाणा आयात करीत आहेत अशी लक्षवेधी आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत मांडली.

सांगली जिल्ह्यातील जीआय मानांकन असलेला बेदाणा दर्जेदार असूनही कमी दर्जाच्या बेकायदा आयात बेदाण्यांमुळे दर मिळत नाही. या बेकायदा आयात करणा-याविरोधात काय कारवाई करणार, आयात बेदाण्याची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे का, या संपूर्ण प्रश्नावर राज्य सरकार समिती स्थापन करून तोडगा काढता येईल का असे प्रश्न रोहित पाटील यांनी उपस्थित केले. फ्रान्स प्रमाणे नाशिक येथे वाईन साठी लागणा-या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. या देशांशी करार करून राज्याच्या पातळीवर संशोधन केंद्र उभा केले जाईल का, द्राक्ष शेती दिवसेंदिवस खर्चिक होत चालली आहे, रोजगार हमी योजनेत द्राक्ष शेतीचा समावेश करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.