scorecardresearch

परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा थांबेना!; एकाची हत्या, अधिकाऱ्यांना धमकविण्याचे प्रकार

सातत्याने कारवाया करूनही जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद चालूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.

अवैध वाळू उपशाविरोधात एका कारवाईत यापूर्वी गाढवे ताब्यात घेण्यात आली होती.

आसाराम लोमटे

परभणी : सातत्याने कारवाया करूनही जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद चालूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. वाळू उपसा करण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यात घडली. अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या लोकांनी प्रशासनाच्या पथकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत धमकावणे ही बाब जिल्ह्यात यापूर्वीही घडली आहे. गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या चोरटय़ांनी  शस्त्राचा धाक दाखवत तहसीलदार सुमन मोरे यांच्या पथकाला धमकावल्याचा गंभीर प्रकार काही महिन्यांपूर्वी पाथरी तालुक्यात घडला होता. पण गंगाखेड तालुक्यातील खुनाच्या घटनेने सर्वानाच हादरा बसला.

रावराजुर (तालुका: गंगाखेड) येथील माधव त्र्यंबकराव शिंदे या युवकास तीन आठवडय़ांपूर्वी २४ मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास काही वाळू माफियांनी दुचाकीवर बसवले आणि गोदावरी नदी पात्रातील वाळू धक्क्यावर आणले. वाळू उपसा करण्यास विरोध का करतो असे म्हणत या युवकास दगड व लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षकांनी तत्परता दाखवल्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला, मात्र वाळू माफियांचे एवढे मनोधैर्य का वाढले याचा शोध महसूल यंत्रणेने घेण्याची आवश्यकता आहे.

सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांमध्ये अवैध वाळूचा व्यवसाय जोरात चालतो. अवैध वाळूचा उपसा करण्यासाठी बोटीपासून ते गाढवापर्यंतचे तंत्र विकसित झाले आहे. गाढवाद्वारे वाळू उपसली जाते आणि सुरक्षित ठिकाणी साठेबाजी केली जाते. अनेकदा हा उपसा करणारी गाढवे पोलीस ठाण्यात आणून बांधली जातात. या गाढवांचे मालक मोकाट असतात. काही दिवसांनी ही गाढवेही पसार होतात, पुन्हा वाळू उपसा सुरू असा प्रकार यापूर्वी अनेकदा घडला आहे. अवैध उपसा करून वाळूची वाहतूक करणारे वाहन जर पकडले तर चालक मालकाविरुद्ध कारवाई होते, मात्र गाढवे पकडली तर कोणावर कारवाई करणार? अर्थात यांच्या मालकीची ही गाढवे आहेत त्या मालकांवर कारवाई केली जाऊ शकते, मात्र अद्याप तरी अशा कारवाया जिल्ह्यात झाल्या नाहीत.

वाळू लिलावात समावेश नसतानाही अनेक गावांच्या हद्दीतून क्रेनच्या साहाय्याने अवजड यंत्राद्वारे वाळू चोरली जात आहे. संध्याकाळी सात वाजल्यानंतरही वाळू माफियांचा सपाटा सुरूच असून रात्रभर अवजड वाहनांचा गोंगाट ऐकू येतो. गोदावरी नदीचे पर्यावरण अनियंत्रित वाळू उपशामुळे बिघडत चालले असून भूगर्भातील पाणी पातळी खोल जात आहे. याचा परिणाम गोदाकाठच्या नागरिकांना भोगावा लागत आहे.  अगदी एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जरी गावातल्या अवैध वाळू उपशाविरोधात भूमिका घेऊ लागला तर त्याला त्याच्या नेत्याचीसुद्धा साथ मिळेल याची खात्री नाही. त्यामुळेच वाळू माफियांचे साम्राज्य समूळ उद्ध्वस्त होऊ शकत नाही. हे वारंवार दिसून आले आहे.

असे आहे गाढवांमागचे अर्थकारण

एका गाढवावर साधारणपणे अर्धा ते पाऊण ब्रास वाळू वाहतूक केली जाते. एका खेपेला १६० रुपये या गाढवांच्या मालकांना मिळतात. एखाद्या व्यक्तीकडे जर पाच गाढवे असतील तर अशी व्यक्ती पाच खेपांचे एका वेळी आठशे रुपये कमावते. गाढवांच्या पाठीवर वाळूच्या गोण्या लादल्या जातात आणि अपेक्षित स्थळी साठा केला जातो. दिवसभर गाढवांच्या अनेक खेपा होतात.  त्या पटीत पैसा वाढत राहतो. महसूल प्रशासनाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हे लोक कोण आहेत त्याची कल्पना असते पण कारवाईच्या वेळी गाढवे हाती लागतात आणि त्यांचे करविते धनी नामानिराळे राहतात. यापूर्वीच्या एका कारवाईत गेल्या वर्षी महसूल पथकाने सोनपेठ तालुक्यातील खडका ते मोहळा दरम्यानच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल २९ गाढवांवर कारवाई करून ती जप्त केली होती. गाढवे जप्त करून एक दिवसही उलटत नाही तोच गाढवे गायब झाली.

दक्षता समित्या काय करतात?

अवैध वाळू उपसा होऊ नये म्हणून ग्राम दक्षता समिती कार्यरत असते. ज्या ठिकाणी अवैध वाळूचा उपसा केला जातो आणि वाहतूक केली जाते अशा ठिकाणी ग्राम दक्षता समितीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे. मात्र या समित्या आपली जबाबदारी पार पाडत नाहीत हे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal sand extraction parbhani district murder intimidation officer ysh

ताज्या बातम्या