मुंबई: राज्यात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची बाब परिवहन विभागाने तयार केलेल्या एक महिन्याच्या अहवालात स्पष्ट झाली. ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अवैध वाहतूकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

राज्यातील अवैध प्रवासी वाहतूकीला आळा घालण्यासाठी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन व एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. राज्यात अवैध वाहतूक वाढली आहे. या वाहतूकीवर योग्य ती कारवाई होत नसल्याने ही वाहतूक दिवसेदिवस फोफावली आहे. असा एक अहवाल या बैठकीत मांडण्यात आला. मुंबई पुणे, मुंबई गोवा, मुंबई नाशिक, या मार्गावर परिवहन विभाग, वाहतूक पोलिस यांच्या संगनमताने अवैध वाहतूक गेली अनेक वर्षे सुरु आहे. मुंबई पुणे मार्गावर चेंबूर, मानखुर्द, वाशी, सानपाडा. बेलापूर, कळंबोली या ठिकाणी या अवैध वाहतूकीचे अड्डे आहेत. पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकाखाली ही अवैध वाहतूक होत आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे. एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा. त्याचा कोणताही गैरवापर केला जाऊ नये. राज्य परिवहन विभाग (आर.टी.ओ.)च्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी. अवैध वाहनांवरील संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात दररोज सादर करणे बंधनकारक आहे. निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला.

एसटीने बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून परिवहन विभागास द्यावी, या अवैध वाहतूकीचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसत आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी या अवैध वाहतूकीवर लक्ष ठेवून अहवाल सादर करावेत. संगनमत व गैरप्रकारांविरोधात स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी, जीपीएस व फोटो रिपोर्टिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.