प्रियंका चोप्रासह ५ जणांना न्यायालयात पाचारण

‘जंजीर-२’ या हिंदी चित्रपटातून पोलिसांचा गणवेश घालून अश्लील हावभाव केले तसेच पोलिस चिन्हांचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरुन दाखल केलेल्या खासगी खटल्यात येथील जिल्हा सत्र न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा, चित्रपटाचा नायक रामशरण, दिग्दर्शक पुनीत मेहरा व सुमीत मेहरा तसेच निर्माते रिलायन्स एंटरटेन्मेंट कंपनीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश जारी केला आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर-२’ या हिंदी चित्रपटातून पोलिसांचा गणवेश घालून अश्लील हावभाव केले तसेच पोलिस चिन्हांचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरुन दाखल केलेल्या खासगी खटल्यात येथील जिल्हा सत्र न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा, चित्रपटाचा नायक रामशरण, दिग्दर्शक पुनीत मेहरा व सुमीत मेहरा तसेच निर्माते रिलायन्स एंटरटेन्मेंट कंपनीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश जारी केला आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी हा आदेश दिला. सध्या पोलिस मुख्यालयात नियुक्त असलेले पोलिस कर्मचारी संजीव पाटोळे यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे. पाटोळे यांच्या वतीने वकिल शिवाजी सांगळे काम पहात आहेत. पुढील सुनावणी ५ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. स्वत: किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचा आदेश आहे.
अमिताभ बच्चन हिरो असलेल्या जंजीर या जुन्या चित्रपटाचा जंजीर-२ हा सिक्वेल आहे. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान तो प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाटोळे यांच्या १२ वर्षांच्या, इयत्ता सहावीतील आयुष मुलाने इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलवर पाहिला. त्यावेळी त्याने वडिलांना ‘तुमचे साहेबही असेच नाचतात का’, असा प्रश्न केला होता. चित्रपटातील ‘मुंबई के हिरो..’ गाण्यावर प्रियंका चोप्राने पोलिस गणवेश घालून, शर्टाची वरील दोन बटणे उघडी ठेऊन, अश्लील नाच केला होता, तसेच गणवेशावर पोलिस चिन्हे लावली होती. ही चिन्हे बेकायदा वापरल्याने तिच्यासह इतरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पाटोळे यांनी दाव्यात केली.
पाटोळे यांनी प्रथम दाखल केलेली फिर्याद प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी, इंटरनेट हा सार्वजनिक भाग नाही, ते माध्यम सार्वजनिक वापराचे नाही, असे कारण देत फेटाळली होती. परंतु पाटोळे यांनी वकिल सांगळे यांच्यामार्फत वरिष्ठ न्यायालयात पुनर्विलोकन दावा दाखल केला. इंटरनेट हा सार्वजनिक भागच आहे, असे या अर्जात म्हटले आहे. हा अर्ज दाखल करुन घेत जिल्हा न्यायालयाने पाचही जणांना नोटिसा जारी करण्याचे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Illegal use of police uniform in zanjeer