शिर्डी, शनिशिंगणापूर, श्रीरामपूर व राहुरी येथे मोठय़ा प्रमाणात गावठी पिस्तुलांची गुन्हेगारांनी खरेदी केली आहे. या शहरामध्ये शस्त्रांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात असून मध्य प्रदेशातून ही शस्त्रे आणली जात आहेत. शस्त्रांचा हा व्यापार थांबविणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मन्सूर सय्यद, प्रसाद फिंगारदिवे, जोसेफ साळवे, उमेश खेडकर, गोवर्धन कदम यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या पाच टोळय़ा कार्यरत आहेत. त्यांनी शिर्डी, शनिशिंगणापूर, श्रीरामपूर व राहुरी येथे अनेक पिस्तुले विकले आहेत. आतापर्यंत ६ महिन्यांत ५ टोळय़ांकडून २५ गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. मध्य प्रदेशातील उमरठी व बलवाडी या गावांत ही पिस्तुले तयार होतात. पोलिसांनी तेथे अनेकदा छापे टाकण्याचा प्रयत्न केला. पण मध्य प्रदेश पोलिसांकडून साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे उपयोग झाला नाही. नगरचे पोलीसही दोनदा गेले, पण पिस्तुलांच्या कारखानदारांना पकडता आले नाही.
शिर्डी येथे साईभक्तांना सेवा पुरविणारे तरुण पॉलीशवाले तर शनिशिंगणापूर येथे शनिभक्तांना सेवा पुरविणाऱ्या तरुणांना लटकू म्हणतात. त्यांच्या आता टोळय़ा तयार झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी खिसेकापू मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्याकडेही टोळय़ा आहेत. या तरुणांकडे मोठय़ा प्रमाणावर कष्ट न करता पैसा येतो. त्यामुळे स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी पिस्तूल जवळ बाळगतात. तसेच श्रीरामपूर व नेवासे येथे अनेक गुन्हेगारी टोळय़ा आहेत. या टोळय़ांमध्ये वैर आहे. त्यातून टोळीयुद्ध सुरू असते. अनेक टोळय़ांकडे शेकडय़ाने पिस्तुले आहेत. गोदावरी, प्रवरा व मुळा या नद्यांतून मोठय़ा प्रमाणात वाळूची तस्करी चालते. वाळूतस्करीला गावकऱ्यांचा विरोध होतो, त्यामुळे लोकांना धमकावण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन अनेक गुन्हेगार नदीपात्रात फिरतात, दहशत पसरवतात तर काही अल्पावधीत श्रीमंत झालेले तरुण हौसेखातर पिस्तूल बाळगतात. यापूर्वी त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. आता मात्र कारवाई सुरू झाल्याने त्यांच्यात घबराट पसरली आहे.