सागर, वय वर्षे ६. ताप आणि उलटय़ांच्या त्रासामुळे त्याला रात्री रुग्णालयात दाखल केले गेले होते. चार डॉक्टरांचे पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. सर्व चाचण्या करून निदान होईस्तोवर मध्यरात्र झाली. सागरला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले. कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टर जितेंद्र गव्हाणे, राजेश पंखुरी आणि विलास गुप्ता यांचे पथक सागरवर उपचार करीत होते. पण उपचार सुरू होतात न होतात तोच.. तो उपचारांना प्रतिसाद देण्यापलीकडे गेला! अन्, डॉक्टरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. एवढासा मुलगा, दाखल केल्यावर काही तासांतच गेला. अशी घटना म्हणजे पाठोपाठ नातेवाईकांचा ‘राडा’, तोडफोड, हाणामारी, उग्र उद्रेक इत्यादीची निश्चिती! असे काही होऊ नये अशी मनापासून प्रार्थना डॉक्टर करीत असतानाच काहीतरी वेगळेच घडले. सागरचे आई-वडील अल्पशिक्षित. वडील नथुराम घाडगे ७वी आणि आई गीता अवघी ५वी शिकलेली. पण आपल्या लहानग्याच्या कायमच्या जाण्याने बसलेला धक्का ओसरून वास्तवाची जाणीव झाल्यावर या दोघांनी एक असामान्य निर्णय घेतला. वर्तमानपत्रही न वाचणाऱ्या अथवा वृत्तवाहिन्या न बघणाऱ्या या मातापित्यांनी आपल्या लहानग्याचे थेट देहदान करण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. हे खरोखर अघटितच होते. पण भीतीदायक नव्हे तर हृदय हेलावून टाकणारे होते. हल्ल्याच्या शक्यतेने भांबावलेल्या डॉक्टरांवर या अशिक्षित परंतु सुजाण पालकांच्या सहृदयमुळे खरोखरच भांबावण्याची वेळ आली होती. त्यांच्या इच्छेनुसार मग डॉक्टरांनी तातडीने हालचाली केल्या आणि सागरचे डोळे दोन गरजूंचे आयुष्य उजळवतील याची निश्चिती केली. सागर
तर गेला पण त्याच्या आईवडिलांनी
त्याच्या दृष्टीच्या रूपाने एक नवीन ‘दृष्टिकोन’ सगळ्या ‘डोळस’ समाजाला दिला.
कर्जत तालुक्यातील नेरळजवळच्या आंबिवलीतील जांब्रुक गावात राहणाऱ्या नवनाथ आणि गीता यांनी सागर आणि प्रिया ही दोन अपत्ये. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उलटय़ा आणि तापाने हैराण झालेल्या सागरला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही तासांतच त्याचे निधन झाले. नवनाथ भायखळा येथे एका छोटय़ा कंपनीत टर्नर म्हणून काम करतात. हातावर पोट असलेल्या घाडगे कुटुंबियांनी आपला सर्व भार पांडुरंगावर सोपवला आहे. ‘इतरांसाठी जगा!’ हा पांडुरंगाचा संदेश जमेल तसा आचरणात आणणे हेच त्यांचे जीवन होते आणि आहे. याच विचाराचा सर्वोच्च आचार त्यांनी कृतीत उतरवला.

सागरचे वडील नथुराम हे मुंबई येथील भायखळा येथे जैन अ‍ॅटो इंटस्ट्रीज या लघुउद्योगात टर्नर आहेत. पोषाखावरून सामान्य दिसणाऱ्या या मातापित्यांनी हे असामान्य बलिदानाचे कृत्य समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे.
– डॉ. जितेंद्र गव्हाणे, एमजीएमचे डॉक्टर