दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांमध्ये तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसांन पुरती वाताहत केली असून आत्तापर्यंत पावसामुळे राज्यभरात ४४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजानंतर प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

रायगड जिल्ह्यामध्ये तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यापाठोपाठ सुतारवाडीमध्ये देखील अशाच घटनेमध्ये ४ जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे एकट्या रायगडमध्ये आत्तापर्यंत पावसामुळे दरड कोसळून ३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा ४४ च्या घरात गेला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे पावसाचं अक्राळ-विक्राळ रुप राज्याच्या काही भागांमध्ये आधीच थैमान घालत असताना पुढच्या २४ तासांमध्ये देखील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

परिस्थिती चिंताजनक आहे, राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सावधगिरीचा इशारा

पश्चिम किनारपट्टीवर २ ते ३ दिवस पावसाचा जोर कायम!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर पुढचे २ ते ३ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं प्रमाण कमी होत जाईल. मात्र, त्यासोबतच कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. उद्या अर्थात २४ जुलै रोजी देखील हे प्रमाण कायम राहणार असून त्यानंतर ते कमी होत जाईल. त्यासोबतच, कर्नाटकमध्ये किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील आज दिवसभर अशाच प्रकारे अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd forecast very heavy rainfall in konkan goa western maharashtra next 24 hours pmw
First published on: 23-07-2021 at 15:50 IST