scorecardresearch

यंदा ९९ टक्के मोसमी पाऊस ; महाराष्ट्रातही उत्तम जलधारांचा हवामान विभागाकडून अंदाज

हवामान विभागाकडून मोसमी पावसाचा  पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : वाढलेल्या तापमानामुळे सध्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच र्नैऋत्य मोसमी पावसाच्या थंडगार सरींच्या अंदाजाची पहिली वार्ता जाहीर झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (१४ एप्रिल) मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार आहे.

महाराष्ट्रातही पावसाची स्थिती चांगली राहणार आहे. मराठवाडय़ाच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (१४ एप्रिल) मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.

हवामान विभागाकडून मोसमी पावसाचा  पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात आला आहे. पुढील सुधारित आणि दुसऱ्या टप्प्यातील अंदात मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल. त्यानंतर नव्या धोरणानुसार हंगामातील प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाकडून एप्रिलच्या सुरुवातीच्या काळातील वातावरणाच्या स्थितीचा आधार घेण्यात आला आहे.

मोसमी पावसाला पूरक ठरणारा हिंद महासागरातील ‘ला निना’ हा घटक संपूर्ण मोसमात सक्रिय राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि  मध्य भारतात अनेक ठिकाणी , हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पर्जन्यभान.  मोसमी पावसाच्या संभाव्य स्थितीच्या अवकाशीय वितरणाचा नकाशाही भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मोसमी पाऊस तुरळक भाग वगळता जवळपास सर्वत्र सरासरी गाठण्याची शक्यता आहे. काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचाही अंदाज आहे. त्यात मराठवाडय़ातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आदी जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, औरंगाबादच्या काही भागांचा समावेश आहे.

भाकीत काय?

’१९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी आहे.

’या सरासरीच्या तुलनेत मोसमाच्या चार महिन्यांत ९९ टक्के पाऊस देशात पडणार आहे.

’त्यात पाच टक्क्यांची तफावत म्हणजे कमी किंवा अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.

तापमानात किंचित वाढ

राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन दिवस किंचित घट दिसून येत होती. मात्र, उत्तर-दक्षिण भागातील राज्यांत पुन्हा तापामानात वाढ झाल्याने राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ सुरू झाली आहे. विदर्भातील अकोला येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. विदर्भात गोंदिया वगळता सर्वत्र तापमान चाळिशीपार आहे. मराठवाडय़ातही तीच स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि पुण्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपुढे आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Imd predicts normal monsoon rainfall in 2022 zws

ताज्या बातम्या