मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा १९ वा दिवस आहे. दरम्यान ते मुंबईकडे यायला निघाले असून १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र त्यांच्या उपोषण आंदोलनाला मुंबई पोलिसांनी संमती दिलेली नाही. दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती उपोषणामुळे खालावली आहे. याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंनी अॅडमिट व्हायला हवं आणि प्रकृतीची काळजी घ्यायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच फडणवीस काय म्हणाले?
मला वाटतं की राज्य सरकारने नेहमीच चर्चा केली. चर्चेची तयारी आम्ही कायमच दाखवली आहे. तसंच मनोज जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या आम्ही मान्य केल्या. एका मागणीमध्ये जी कायदेशीर अडचण आहे तीदेखील त्यांना समजावून सांगितली. आता त्यांनी सणासुदीच्या काळात आणि गणेश उत्सवाच्या पर्व सुरू आहे. मुंबई, पुण्यात किती उत्साहात उत्सव साजरा होतो हे सगळ्यांना माहीत आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगेंनी आंदोलनाचा निर्णय करू नये. अनेक दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरही विपरित परिणाम होतो आहे. त्यांनी अॅडमिट झालं पाहिजे, उपचार घेतले पाहिजेत. आंदोलन पुढेही करता येईल. पण प्रकृती सांभाळली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. सरकार खुल्या मनाने सगळ्या गोष्टी मान्य करतं आहे. त्यामुळे मुंबईला येऊन या ठिकाणी गणेश उत्सवात ताण तयार होईल असं आपण करू नये असं आमचं मत आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रकृतीमध्ये मोठे चढउतार होत असल्याने त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पाटोदा येथे विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासमध्ये त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. असे उपचार घ्यावेत अशी विनंती समाजबांधवाच्या वतीने तसेच नारायण गडाचे हभप शिवाजी महाराज आणि लक्ष्मणमहाराज मेंगडे या दोघांनी विनंती केली. ते दोघेही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. या नव्या घडामोडीमुळे जरांगे यांच्या मुंबईच्या प्रवासाबाबत तूर्त अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मनोज जरांगे पाटोदा या ठिकाणीच घेत आहेत विश्रांती
अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. त्यांना हात-पाय हलवणे देखील कठीण झाले आहे. प्रकृती अधिक गंभीर बनल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाटोद्यात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशक्तपणामुळे त्यांनी अद्याप कोणाचीही भेट घेतलेली नाही. प्रकृती साथ देत नसली तरी, पाटोदा येथे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा समाजबांधवांशी त्यांनी मध्यरात्री संवाद साधला. प्रकृती अत्यंत नाजूक बनल्यामुळे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार जरांगे पाटील सध्या पाटोद्यातच विश्रांती घेत आहेत.
