अलिबाग : जप्त केलेली स्फोटकं निकामी करताना तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना, महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड गावाजवळ ८ मार्चला घडली होती. या अपघातात बॉम्बरोधक पथकातील पोलीस कर्मचारी आशीर्वाद लगदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.  

     महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे बॉम्बरोधक पथकाला मिळाले होते. त्यानुसार अलिबाग येथून तीन कर्मचारी स्फोटके निकामी करण्यासाठी महाडमध्ये दाखल झाले होते.  कांबळेतर्फे महाड येथील एका दगड खाणे हा मुद्देमाल नष्ट करण्याचे काम सुरू होते. या वेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये राकेश दोषी, रमेश कुटे, आशीर्वाद लगदे हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील आशीर्वाद लगदे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर करून उपचारासाठी तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. गेली दोन महिने त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.

     स्फोटाची तीव्रता खूप जास्त असल्याने त्यांना अनेक जखमा झालेल्या होत्या, चेहरा, डोळे आणि पोटामध्ये अनेक अनेक छोटे-मोठे कण रुतलेले होते. डाव्या डोळय़ामध्ये एक मोठा पत्र्याचा तुकडा घुसल्यामुळे मोतीबिंदू व डोळय़ातील पडदा फाटला होता. उजवी बरगडी तुटली होती. आतडे आणि यकृत यांसारख्या संवेदनशील अंतर्गत अवयवांमध्ये जखमा झाल्या होत्या.

उजव्या कानातही त्रास होऊ लागला होता आणि पोटाच्या बाजूला अनेक जखमा होत्या.  त्यामुळे आशीर्वाद यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमधील तज्ज्ञ कन्सल्टन्ट्सची टीम एकत्र आली उपचार सुरू केले, या उपचारांना आता आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची ९०% दृष्टी परत आली आहे. तर इतर जखमाही बऱ्या होत आहेत. वैद्यकीयदृष्टय़ा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन नोकरीत पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांना जवळपास एक वर्ष लागेल, असा अंदाज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

‘महाड स्फोटक दुर्घटनेत जखमी झालेल्या तीनही सहकाऱ्यांवरील उपचाराचा सर्व खर्च पोलीस प्रशासनाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस कल्याण योजनेंतर्गत मदत दिली जाणार आहेच याशिवाय ज्या उपचारांचा खर्च या योजनेत समाविष्ट नाही त्यासाठी वेगळा निधी रायगड पोलीस दलाने उभारला आहे.  आशीर्वादला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

– दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेशण विभाग

‘आतडय़ांना झालेल्या जखमा बऱ्या करण्यात आल्या असून आता, आशीर्वाद नियमित जेवण जेवू शकत आहे आणि पचनदेखील सर्वसामान्यपणे होत आहे. पुढील वर्षभरात ते पूर्ण तंदुरुस्त होतील असा विश्वास आम्हाला वाटतोय. त्यांच्या तब्येतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.’

– डॉ शालीन दुबे, शल्यचिकित्सक अपोलो रुग्णालय