दूर टेकल्या आभाळाची, शपथ तुला क्षितिजाची,
खरं खरं सांग चंद्रमाला साक्षी ठेवून,
झिझिम पावसात कोवळ्या सकाळी,
मोत्यांचा थेंब होशील का?
कवी कुलगुरू कालिदास दिनाचे औचित्य साधून आयोजित कविसंमेलनात कवीने अशी भावोत्कट अपेक्षा व्यक्त करताना संपूर्ण सभागृह कालिदासाच्या आठवणींनी भावविभोर झाल्याचे जाणवत होते. प्रसंग होता आषाढय़स्य प्रथमे दिवसाचा.
सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समूहाअंतर्गत लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाने यंदा कवी कालिदास दिनानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये एकाच वेळी १०८ ठिकाणी कविसंमेलने आयोजिली होती. यात विशेषत: ग्रामीण भागात झालेल्या कविसंमेलनांना भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रथितयश व नवोदित अशा एकूण १०४८ कवी मंडळींनी या उपक्रमात सहभागी होऊन कालिदासाचे स्मरण करताना रसिकांना काव्यधारांनी चिंब भिजवून टाकले.
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात सामाजिक, आर्थिक, शेती, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास कार्यात स्वत:चा ठसा निर्माण करणाऱ्या लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष देशमुख हे नेहमीच अग्रेसर राहतात. त्याचाच एक भाग म्हणून वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांनी कवी कालिदास दिन साजरा करण्यात आला.
सोलापुरात लोकमंगल प्रशालेत प्रथितयश कवींबरोबर शालेय विद्यार्थ्यांनीही कविता सादर करून सुप्त गुणांचे दर्शन घडविले. गुरुसिद्ध गायकवाड याने ‘ॠण’ ही कविता सादर करून सर्वाना अंतर्मुख केले. राळेरास (ता. बार्शी) येथे आयोजिलेल्या कविसंमेलनात दुष्काळाबरोबर पाऊस व पर्यावरणावर कविता सादर करण्यात आल्या. तर कारंबा व वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे झालेल्या कविसंमेलनाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत आपली रसिकता जपली. शहर व जिल्ह्य़ासह बेळगाव, छत्तीसगढ आदी ठिकाणी कविसंमेलने झाली. यात गोविंद काळे, ए. डी. जोशी, बदिउज्जमा बिराजदार, अविनाश बनसोडे, राजेंद्र डांगे, डॉ. अजीज नदाफ, पुरुषोत्तम नगरकर, विश्वनाथ निंबाळे, आशा पाटील, वंदना कुलकर्णी आदी कवींचा सहभाग होता. बेळगावात सरजू ताटकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, ऊर्मिला शहा, मल्लिनाथ पवार आदी कवींनी उत्तमोत्तम कविता सादर करून रसिकांना आनंद दिला. छत्तीसगढमध्ये सहारनपूर येथे झालेल्या लोकमंगल कविसंमेलनात इंद्रकुमार कुम्हार, अजय भांगडे, मोहन ज्योती यांनी कविता सादर केल्या.