अहिल्यानगर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संगणक प्रणालीतील बिघाडामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. जिल्हाभरातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी त्रस्त झाले आहेत. नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत असली, तरी संगणक प्रणालीतील अडचण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करताना जाणवत आहे.
निवडणूक आयोगाने ५ नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू केली, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असून, केवळ ७ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यात रविवारी सुटी असल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. या निवडणुकीत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने संगणक ज्ञान नसलेल्या अनेक उमेदवारांना सेतू केंद्र, सायबर कॅफे किंवा खासगी संगणक केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी या केंद्रांच्या चालकांना उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी नगराध्यक्ष पदासाठीची ऑनलाइन प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने उमेदवार आणि संगणकचालक दोघेही वैतागले आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याचे सुरुवातीचे दोन दिवस वाया गेले असून, उमेदवारांत अस्वस्थता आणि नाराजी आहे. निवडणूक विभागाच्या पोर्टलवर ‘सर्व्हर एरर’ आणि ‘डेटा नॉट रिस्पॉंडिंग’ अशा त्रुटी संदेशांमुळे अनेकांचे अर्ज भरले जात नाहीत. या संदर्भात काही उमेदवारांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवून प्रणाली तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने या तांत्रिक बिघाडाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे.
दरम्यान, नगरसेवक किंवा सदस्य पदासाठीची प्रणाली सुरळीत कार्यरत असून, फक्त नगराध्यक्ष पदाच्या ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक बिघाड असल्याने प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, आता उशीर झाल्यास अर्ज भरण्याची वेळच निघून जाईल, त्यामुळे आयोगाने तत्काळ हस्तक्षेप करावा.
