हिंगोली : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण उडवली असून अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे झाडे विद्युत वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
हिंगोली शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, पालिकेचे अग्निशमनदल कार्यालय, जुनी पोलीस वसाहत या भागांत मोठे वृक्ष उन्मळून पडले. अग्निशमनदल कार्यालयाच्या परिसरातील झाड वाहनांवर पडल्यामुळे एक जीप व एका ऑटोचे नुकसान झाले. शहरात लहान-मोठी सुमारे १०० झाडे पडली आहेत. याशिवाय शहरातील काही भागांत घरांवरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. काही पत्रे वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांना अडकून मोठा आवाज झाला, तर काही ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत.




शहरातील जुन्या पोलीस वसाहतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांवर वीज वाहिन्या कोसळल्या. वाहनांमधे कोणीही नसल्याने अनर्थ टळला. यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, अभियंता दिनकर पिसे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात पाहणी सुरू केली आहे. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान सात ते आठ तास लागण्याची शक्यता महावितरणचे अभियंता दिनकर पिसे यांनी वर्तविली.
सर्कसच्या तंबूचे नुकसान
शहरातील रामलीला मैदानावर गेल्या आठवडय़ापासून सर्कस आली आहे. या ठिकाणी सर्कसचा तंबू उभारण्यात आला. मात्र अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तंबू उडून गेल्याने यात सर्कसचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.