कराड : नातेवाईक मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव (ता. वाळवा) येथील एका युवकाचे सात जणांनी अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रहिमतुल्ला सलीम आतार (वय २७) असे मृत युवकाचे नाव असून, रहिमतुल्लाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कराड तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही तासांत सात संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.

पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाची नातेवाइक असलेल्या कराडमधील मुलीबरोबर रहिमतुल्ला आतार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. रहिमतुल्ला हा भ्रमणध्वनी (मोबाईल) दुरूस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कराडला नेहमी येणे-जाणे होते.

सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संशयितांनी दोन चारचाकी वाहनांतून येऊन वाठार (ता. कराड) येथून रहिमतुल्लाचे अपहरण केले, व त्यास रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी सळी, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर जख्मी आवस्थेत रहिमतुल्लाला संशयितांनी त्याच्या घरी सोडले.

यानंतर गंभीर जख्मी रहिमतुल्लाला त्याच्या नातेवाइकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सूरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कराड विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, फौजदार साक्षात्कार पाटील यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रेठरे, वाठार व कासेगाव येथे शोध मोहीम राबवून सातही संशयितांना ताब्यात घेतले. अधिक तपास सखाराम बिराजदार करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण,पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सखाराम बिराजदार, साक्षात्कार पाटील, कासेगाव पोलिस ठाण्याचे फौजदार कृष्णत कांबळे, कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी केली.