मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत असून यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी सोमवारी मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होईल. सुरुवातीस या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचारसभा न घेण्याची भूमिका घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला.

निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १ कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष आणि १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला; तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सुमारे १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचे भवितव्य हे सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर ठरणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४७१ मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. त्याचबरोबर व्हिलचेअरचीही व्यवस्था केली जाईल; तसेच मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

प्रत्येक मतदाराला दोन मतांचा अधिकार

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाचवेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला तर एक मत पंचायत समितीच्या उमेदवाराला द्यावे लागेल. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर(बीयू) पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जाईल.

मतदारांचे नाव शोधण्याची सुविधा

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ (Matadhikar) हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.

या निवडणुका आपले गाव व परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या गाव व परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आपण नक्की मतदान करावे. -दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त,

भाजप पहिला क्रमांक कायम राखणार ?

महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकविला होता. जिल्हा परिषदांमध्येही पहिला क्रमांक पटकावून ग्रामीण भागात पक्षाची पाया अधिक भक्कम करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने राष्ट्रवादीने प्रचारातून माघार घेतली असली तरी सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला होतो का, हे निकालातून स्पष्ट होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीसाठी जोर लावला होता. निवडणुकात होत असलेल्या बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रचार सभांसाठी दौरा केला. काँग्रेसही आपला ग्रामीण भागातील पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.