सांगली : यंदा गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आले असल्याने मिरजेत पैगंबर जयंतीची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचा निर्णय जुलूस कमिटीने घेतला असल्याचे कमिटीचे असगर शरीकमसलत यांनी मंगळवारी सांगितले.

पैगंबर जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद हा मुस्लिमांचा सण १६ सप्टेंबर रोजी आहे. याचवेळी गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती निमित्त मिरवणुकीचा मिरजेत एकच मार्ग आहे. गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती उत्साहात साजरी करता यावी, दोन्ही धर्माच्या सणांना कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पैगंबर जयंतीची मिरवणूक गणेश विसर्जन झाल्यानंतर म्हणजे १९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय जुलूस कमिटीने घेतला आहे, असे शरीकमसलत यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष ए.जी. नदाफ, महमंद सतारमेकर, सलिम मगदूम उपस्थित होते.

हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “दिलेली जबाबदारी…”

पैगंबर जयंतीची मिरवणूक १९ सप्टेंबर रोजी मिरजेतील बाराइमाम दर्ग्यापासून सकाळी आठ वाजता निघणार असून निर्धारित मार्गाने मिरासाहेब दर्ग्याजवळ सांगता होणार आहे. प्रार्थनेनंतर महाप्रसादाची व्यवस्था जुलूस कमिटीच्यावतीने करण्यात आल्याचे शरीकमसलत यांनी सांगितले.