अलिबाग– मुरुड येथील ऐतिहासिक खोकरी घुमटाची माहिती आता ऑडीओ गाईडच्या माध्यमातून मिळणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पुरातत्व विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. क्यू आर कोड स्कॅन करून पर्यटकांना ऑडीओ गाईड सुविधा मोबाईलवरच उपलब्ध करता येणार आहे.

मुरूड तालुक्यात राजपुरी ग्रामपंचात हद्दीत ऐतिहासीक खोकरीचे गुंबज गोल घुमट आहेत. या नवाबकालीन ऐतिहासिक वारसा स्थळाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र गाईड उपलब्ध नसल्याने त्यांना या वारसा स्थळाची अचून माहिती उपलब्ध होऊ शकत नव्हती. पुरातत्व विभागाच्या माहिती फलकांवर उपलब्ध माहितीच या पर्यटकांना मिळत होती. हीबाब लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने खोकरीचे घुमट येथे आता ऑडीओ गाईड सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यामुळे मुरुड जंजिरा किल्ल्या पाठोपाठ आता खोकरी घुमटांची माहिती ऑडीओ गाईड स्वरुपात उपलब्ध झाली आहे. क्यू आर कोड स्कॅन करून ही सुविधा येणार सर्व पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. नुकताच या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खोकरी गुंबड ई-वाॅक ऑडिओ गाईडचे उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ – डॉ. ए.व्ही. नागानूर, सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ शेख मुहिब , संवर्धन पुरातत्वशास्त्रज्ञ राजेश दिवेकर, संशोधन सहाय्यक किन्नरी पोलाडिया ,पुरातत्व सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर, पुरातत्व बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यावेळी उपस्थित होते.

मुरुडमधील खोकरी घुमट हे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे शिल्प इतिहासप्रेमींचे आकर्षण आहे.या ठिकाणी सिध्दी सिरुलखान, सिध्दी खैरियतखान आणि सिध्दी याकुतखान यांच्या या कबरी आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेले आहेत. या ऐतिहासिक घुमट वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असल्याने सदरील हे ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी देशी- विदेशी पर्यटक येत असतात. परंतु माहिती विना फक्त फोटो काढून परतावे लागत होते आता ” ई-वाॅक ऑडिओ गाईड सुविधा उपलब्ध झाल्याने, पर्यटकांची गैरसोय टळणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतुन ऑडिओ स्वरुपात माहिती मिळणार आहे

घुमटींचे बांधकाम कधी झाले….

सर्वात मोठे घुमट गुंबज हे सिद्दी सिरूलखानचे असून हे १६७० ते १६७७ व १६९६ ते १७०७ या कालावधीत बांधले होते. सिद्दी याकुतखान हा १६७० ते १६७७ व १६९६ ते १७०७ या कालावधीत तर सिद्दी खैरियत खान हा याकुतखानाचा भाऊ १६७७ ते १६९६ या कालावधीत बांधले होते. या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे.